वाकण-पाली महामार्गावर चिखल

वाहतुकीला अडथळा, अपघाताचा धोका

। सुधागड-पाली । वार्ताहर ।
वाकण-पाली-खोपोली राज्य महामार्ग क्रमांक 548 (अ) च्या रुंदीकरणाचे काम अनेक महिन्यांपासून संथगतीने सुरू आहे. पावसामुळे अपूर्ण काम झालेल्या मार्गावर शुक्रवारी मोठ्या प्रमाणात चिखल व राडारोडा आला होता. परिणामी वाहतुकीला अडथळा येत असून चिखल व खड्ड्यांमुळे अपघाताचा धोका वाढला आहे.


पाली ते रासळ हा 3 किमीचा मार्ग तसेच तिवरे गावाजवळील मार्गावर, उंबरे गावाजवळ सध्या खूप दुरवस्था झाली आहे. इतरही काही ठिकाणी अशीच परिस्थिती आहे. मार्गावरील मोठाल्या खड्ड्यात वाहने आदळतात. शिवाय खड्डे वाचविताना अपघाताचा धोका आहे. चिखलामुळे दुचाकीस्वार घसरत आहेत. या राज्य महामार्गाचे काम गेल्या 4 वर्षांपासून सुरू आहे. मात्र अजूनही ते पूर्ण झालेले नाही. लॉकडाऊनमुळे मजुर गावी गेले असल्याने काम संथ गतीने सुरू आहे. अपूर्ण व अर्धवट असलेले काम, काही ठिकाणी खराब झालेला मार्ग यामुळे प्रवासी, वाहनचालक व नागरिकांची प्रचंड गैरसोय होत असून संताप व्यक्त केला जात आहे.

काम संथ
मार्च महिन्यात या राज्य महामार्गाचे काम 55 टक्के पूर्ण झाले होते. जून अखेर पर्यंत 100 टक्के काम पूर्ण होईल. आणि मे अखेर पर्यंत येथील संपूर्ण रस्त्याचे काम पूर्ण होईल आणि पाली, भालगुल व जांभुळपाडा या मोठ्या पुलांचे काम जून अखेर पर्यंत पूर्ण होईल असे मार्च महिन्यात एमएसआरडीसीचे उपअभियंता सचिन निफाडे यांनी सांगितले होते. मात्र सध्या संथ व अपूर्णावस्थेतील कामामुळे पावसाळ्यात येथून प्रवास करणे जिकरीचे झाले आहे.

मार्गावर जिथे पाणी व चिखल साठला आहे. तिथे लगेच कठीण मुरूम व खडी टाकून सपाटीकरण करून घेणार आहोत. 2-4 दिवसांत एका बाजूच्या रस्त्याचे काँक्रीटीकरणचे काम पूर्ण करून मार्ग सुस्थितीत केला जाईल व तेथून वाहतूक वळवली जाईल.

सचिन निफाडे, उपअभियंता, एमएसआरडीसी.

संथ व अर्धवट कामामुळे तसेच योग्य नियोजनाच्या अभावाने या मार्गाची काही ठिकाणी दुरवस्था झाली आहे. पावसाळ्यात येथून प्रवास करणे अत्यंत त्रासदायक होत आहे. लवरक हा मार्ग सुस्थितीत करावा

विकी भऊड, पाली



Exit mobile version