मुंबई-गोवा महामार्ग समस्यांच्या विळख्यात

। पाली/बेणसे । प्रतिनिधी ।

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या पळस्पे ते इंदापुर या 84 किमी लांबीच्या रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम संथगतीने सुरु आहे. महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम 13 वर्षापासून रेंगाळत असल्याने जनतेचे प्रचंड हाल होत आहेत. मृत्यूचा सापळा म्हणून ओळख असलेल्या या महामार्गाला समस्यांचा विळखा बसलाय. मुंबई-गोवा महामार्गावर वडखळ, आमटेम, निडी, नागोठणे, वाकण नाका, कोलाड, इंदापूर माणगाव पट्ट्यात आता खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. परिणामी, या मार्गावर अनेक अपघात घडत असून प्रवासी रडकुंडीला आले आहेत. त्यामुळे यावर जलद उपाययोजना करण्याची मागणी जनतेतून होत आहे.

मुंबई-गोवा महामार्गाची प्रचंड दुरवस्था झाली आहे. पावसाळ्यामध्ये या महामार्गाचे वास्तव अधिकच भयानक झाले असल्याचे दिसते. आता या जीवघेण्या मार्गावरून अनेक प्रवासी आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करीत आहेत. या महामार्गावरील प्रवास म्हणजे जणू बोटीतून प्रवास करीत असल्याचा अनुभव येत असल्याची प्रतिक्रिया अनेक प्रवाशांकडून देण्यात आली आहे. अलिकडे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे बुजविण्यासाठी वापरलेली खडी मुसळधार पावसात पुन्हा एकदा वाहून गेल्याने या मार्गाला तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. त्यामुळे अनेकदा वाहन चालक खड्डे वाचवण्याच्या नादात अपघाताला निमंत्रण देत आहेत. याशिवाय वाहनात बिघाड, कंबर, मान, पाठ, मणक्यासारखे आजारही बळावले आहेत.

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला सुरुवात झाल्यापासून 84 कि.मी.च्या मार्गासाठी तब्बल सहा हजार कोटी रुपये खर्च झाले आहेत. अद्यापही काम पूर्ण झालेले नाही. मुंबई-गोवा महामार्गावर 3000 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. या मार्गावरुन नियमित प्रवास करणारे प्रभू तांडेल म्हणाले की, या महामार्गासाठी अजून किती आंदोलने करावी म्हणजे सरकारला जाग येईल, अजून किती निष्पाप जीव गेल्यावर हा मार्ग होईल, ज्याच्या घरातील व्यक्ती अपघातात मृत्युमुखी पडते, त्यांच्या वेदना व दुःख काय असते याची जाणीव शासनकर्त्यांना नाही. कामाचा दर्जा घसरला आहे. कुणाचे कुणावर नियंत्रण नाही. अजून पाच वर्ष जनतेच्या वाट्याला हे भोग आहेत. दुसरं काही होणार नाही, असे तांडेल म्हणाले.

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम एक तपाहून अधिक काळ सुरू आहे. खड्डेमय मार्ग, दिशादर्शक सूचना फलकांचा अभाव, खड्ड्यांचे साम्राज्य आदी अनेक कारणांमुळे चालक हैराण आहेत. गणेशोत्सवादरम्यान मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डे भरण्याचे आदेश दिल्यामुळे तात्पुरती मलमपट्टी करण्यात आली खरी, मात्र पुन्हा रस्त्याची स्थिती ’जैसे थे’च आहे. सरकारने महामार्गाची जलद सुधारणा करावी.

असगर सय्यद,
सामाजिक कार्यकर्ते
Exit mobile version