मुंबई-गोवा महामार्ग राजकीय हस्तक्षेपामुळे रखडला:  मनसे अध्यक्ष राज ठाकरे

| रायगड | प्रतिनिधी |

गेल्या 17 वर्षांपासून रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाच्या पाहणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे रविवारी (दि.9) रायगड दौऱ्यावर होते. दरम्यान, त्यांच्या हस्ते पनवेल आणि माणगाव येथे मनसेच्या कार्यालयांचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारले असता, त्यांनी सर्व सत्ताधारी नेत्यांवर टीका केली. राजकीय हस्तक्षेपामुळे हा महामार्ग रखडला असल्याचे राज ठाकरेंनी स्पष्ट केले. तसेच, यावेळी त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह स्थानिक नेत्यांचाही उल्लेख केला.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे रविवारी रायगड दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी केली. या महामार्गाबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारले असता त्यांनी स्थानिक नेत्यांसह केंद्रीय मंत्री यांच्यावर टिका केली आहे. यावेळी बोलताना राज ठाकरे म्हणाले की, राजकीय हस्तक्षेपामुळे मुंबई-गोवा महामार्ग होत नाही. मी मागे याबाबत नितीन गडकरींनाही फोन केला होता. ते म्हणाले होते की, ठेकेदार कंटाळून निघून गेले आहेत. नितीन गडकरी हे रस्ते विभागाचे केंद्रीय मंत्री आहेत. ते कोकणातील कंत्राटदारांबद्दल कंटाळून निघून गेले असे बोलत असतील तर ते कोणाला कंटाळून निघून गेले? असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला.

ते पुढे म्हणाले, आतापर्यंतची पद्धत अशी आहे की, तुम्हाला रस्ता बांधायचा असेल तर जमिनीचे संपादन सरकारने करून द्यायचे असते. हे सगळे रस्ते करत असताना हीच समस्या निर्माण झाली. सरकारने जमिन संपादित करून दिली नाही. कंत्राट दिले, टक्केवारी दिली. वर्षानुवर्षे हेच सुरू आहे. मी आता नवीन बांधलेल्या रस्त्यावरून आलो, काय अवस्था आहे या रस्त्याची? नवीन बनवलेल्या रस्त्याची ही अवस्था असेल तर बायपासची गरज काय? असे राज ठाकरे म्हणाले. विकास करताना टक्केवारीचाच विचार केला जात आहे. आमच्या जमिनी कशा विकल्या जातील हाच व्यवहार सुरू आहे. आता सध्या तिसऱ्या मुंबईच सुरू आहे. तिसऱ्या मुंबईमध्ये एज्युकेशनल सिटी, मेडिकल सिटी, डेटा सेंटर, ग्लोबल संस्था, आंतरराष्ट्रीय विद्यापीठ असणार आहेत. परंतु, हे महाराष्ट्रातील मुलांनाही माहिती नाही. येथील स्थानिक माजी जमीन मालक म्हणूनच येथे राहणार असून, त्यांच्या समोर ही तिसरी मुंबई तयार होणार आहे. या तिसऱ्या मुंबईबाबत पेण, पनवेलसह संपुर्ण रायगडच्या मुलांना आपण तयार करतोय का? आता शहरे उभी करायची, रस्त्यांची वाट लावायची आणि जमिनी विकण्याचा धंदा सुरू आहे. विकासाला विरोध करायचा नाही; परंतु, कोकणातील विकास पाहिला तर असा विकास नको असे वाटते, असा संताप राज ठाकरेंनी व्यक्त केला.

स्थानिक नेत्यांवर आगपाखड
महाराष्ट्रातील पोरांची प्रगती होत नसेल तर ही जमीन चाटायची आहे का? विकास कुठे होणार आहे, हे स्थानिक आमदार आणि खासदारांना माहित आहे. मग ते तिथे जमिनी विकत घेणार. त्यानंतर सरकार अदानी वगैरेंना या जमिनी विकणार. हे राजकारण्यांना माहिती आहे. स्थानिकांना हे समजणे गरजेचे आहे. सगळीकडे खा. तटकरे आणि त्यांची मुलगी, आ. ठाकूर आणि त्यांचा मुलगा, हेच सुरू आहे. हे आमच्या लोकांना समजत नाही, असे म्हणत राज ठाकरे यांनी स्थानिक नेत्यांवर आगपाखड केली.
Exit mobile version