मुंबईमधील शाळांच्या घंटा आजपासून वाजणार; दोन वर्षानंतर वर्ग भरणार

। मुंबई । वृत्तसंस्था ।
मुंबई आणि परिसरातील पूर्व प्राथमिक ते बारावी पर्यंतच्या शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालये सोमवारी, 24 जानेवारीपासून सुरू होत आहेत. यात मागील दोन वर्षांपासून बंद असलेल्या पूर्व प्राथमिक शाळा या पहिल्यांदा सुरू होणार असल्याने या शाळा परिसरात लहान मुलांचा किलबिलाट पहावयाला मिळणार आहे.

शाळेच्या पहिल्या दिवशी आणि पहिल्याच शाळेत पाऊल ठेवणाऱ्या पूर्व प्राथमिक शाळा, वर्गातील चिमुकल्यांचे शाळा आणि संस्थांकडून स्वागत केले जाणार असल्याचे शाळांकडून सांगण्यात आले. राज्यातील प्रमुख शहरातील शाळा आणि त्यानंतर ग्रामीण भागातील ३ जानेवारीपासून बंद करण्यात आल्या होत्या.आता त्या पुन्हा गजबजणार आहेत. या शाळा सुरू करण्यासाठी शालेय शिक्षण आणि महापालिका शिक्षण विभागाने जीआर आणि स्वतंत्र असे परिपत्रक जारी केले असून त्यात कोरोना आणि त्याच्या नियमाचे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने राज्यातील शाळा, कनिष्ठ महाविद्यालये ही 15 फेब्रुवारी पर्यंत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र त्या विरोधात पालक संघटना, शिक्षण तज्ञ यांच्यासह विविध स्वयंसेवी संघटनांच्या प्रतिनिधींनी मागणी लावून धरल्याने शिक्षण विभागाने शाळा सुरू करण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे सादर केला होता, त्याला चार दिवसांपूर्वी मंजुरी मिळाली होती. त्यानंतर शिक्षण विभागाने पहिली ते बारावीपर्यंतच्या शाळासोबत पूर्व प्राथमिक शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता.

Exit mobile version