पलटणचा कोलकातावर ऐतिहासिक विजय; 13 वर्षांचा वनवास संपवला
| मुंबई | प्रतिनिधी |
आयपीएल 2026 मधील दुसऱ्या सामन्यात मुंबई इंडियन्सने वानखेडे स्टेडियमवर कोलकाता नाईट रायडर्सचा 6 गडी राखून धुव्वा उडवत हंगामाची विजयी सुरुवात केली. तब्बल 14 वर्षांनंतर मुंबईने स्पर्धेतील पहिलाच सामना जिंकत चाहत्यांना मोठी भेट दिली. कोलकाताने दिलेल्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना रायन रिकल्टन आणि रोहित शर्माने हिट शो दाखवत सगळं चित्रच बदलून टाकले. कोलकाताने 20 षटकांत 221 धावांचे एक विशाल लक्ष्य उभारले होते. मात्र, मुंबई इंडियन्सने हे लक्ष्य केवळ 19.1 षटकांत सहजपणे गाठले आणि एका ऐतिहासिक विजयाची नोंद केली.
मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. सुरुवातीलाच अजिंक्य रहाणे आणि फिन ॲलन यांनी कोलकाताला जबरदस्त सुरुवात करून दिली. दोघांनी मिळून पहिल्या बळीसाठी 69 धावांची भागीदारी केली. मात्र, ही जोडी शार्दुल ठाकूरने फोडत मुंबईला पहिले यश मिळवून दिले. फिन ॲलनने 37 धावांची तुफानी खेळी केली. त्यानंतर आलेल्या कॅमेरून ग्रीननेही थोडा प्रतिकार केला, परंतु शार्दुल ठाकूरने त्यालाही 18 धावांवर बाद करत कोलकाताला दुसरा धक्का दिला. त्यानंतर कर्णधार अजिंक्य रहाणेने डाव सांभाळत आक्रमक फलंदाजी केली. त्याने 40 चेंडूत 67 धावांची शानदार खेळी साकारली. रहाणेचा फॉर्म पाहता तो मोठी खेळी करणार असे वाटत असतानाच पुन्हा एकदा शार्दुल ठाकूरने त्याला बाद करत मुंबईला महत्त्वाचे यश मिळवून दिले. दुसऱ्या बाजूला अंगकृष रघुवंशीनेही तितक्याच आक्रमक शैलीत फलंदाजी करत 51 धावा ठोकल्या. अखेरीस रिंकू सिंगने 33 धावा करत संघाची धावसंख्या 220 पर्यंत पोहोचवली. मुंबईकडून शार्दुल ठाकूरने सर्वाधिक 3 बळी घेत कोलकाताच्या फलंदाजांना आवर घालण्याचा प्रयत्न केला; तर, कर्णधार हार्दिक पांड्याला 1 बळी मिळाला.
कोलकाताने दिलेल्या 221 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईचे सलामिवीर रोहित शर्मा व रायन रिकल्टन यांनी आक्रमक सुरूवात केली. या जोडीने कोलकाताच्या अनुभव कमी असलेल्या गोलंदाजांना झोडले. या दोघांनी 11.5 षटकांत फलकावर 148 धावा चढवल्या. रोहितचा खेळ डोळ्यांचे पारणे फेडणारा ठरत होता आणि त्याने अवघ्या 23 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. हे त्याचे आयपीएलमधील सर्वात वेगवान अर्धशतक ठरले. यादरम्यान, कोलकाताच्या क्षेत्ररक्षकांनी झेल टाकले आणि रोहितची आक्रमकता पाहून त्यांचे मनोबल खचले. मात्र, 12व्या षटकात रोहितचा झेल घेतला आणि तो 38 चेंडूंत 78 धावांवर बाद झाला. त्यानंतर रिकल्टन 81 धावांवर धावबाद झाला. तत्पूर्वी इम्पॅक्ट प्लेअर म्हणून आलेला सूर्यकुमार यादव 16 धावांवर माघारी परतला. हार्दिक पांड्या (नाबाद 18) व तिलक वर्मा (20) यांनी सहा गडी राखून मुंबईचा विजय पूर्ण केला. त्यामुळे सलग तेरा वर्षे पहिला सामना हरणाऱ्या मुंबई इंडियन्स संघाने यंदाचा पहिला सामना जिंकून 14 वर्षांचा दुष्काळ संपवला आहे. तसेच, शार्दुल ठाकूरला सामनावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
वानखेडेवर रो‘हिट' शो
वानखेडे मैदानावर रोहित शर्माचा हिट शो पाहायला मिळाली. आपल्या घरच्या मैदानावर खेळताना रोहितने कोलकार्ता संघाच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. रोहितने 78 धावांची दमदार खेळी केली. या खेळीदरम्यान रोहितने 6 चौकार आणि 6 गगनचुंबी षटकार खेचले. त्याचबरोबर रोहित शर्मा हा आयपीएलमध्ये एकाच संघाविरुद्ध सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत अव्वल स्थानी पोहोचला आहे. या विक्रमात त्याने विराट कोहलीला मागे टाकले आहे. रोहितने कोलकाता नाईट रायडर्स संघाविरुद्ध खेळताना एकूण 1,161 धावा केल्या आहेत. विराटच्या नावे कोलकाता संघाविरुद्ध खेळताना 1,159 धावा करण्याची नोंद आहे. त्यामुळे विराट कोहली या यादीत दुसऱ्या स्थानी घसरला आहे.
अनेक विक्रमांची नोंद
या सामन्यात मुंबई इंडियन्सने केवळ विजयच मिळवला नाही, तर अनेक विक्रमही प्रस्थापित केले आहेत. कोलकाता विरुद्धचा हा मुंबईचा 25वा विजय ठरला असून आयपीएलच्या इतिहासात एकाच प्रतिस्पर्ध्याविरुद्ध 25 सामने जिंकणारा पहिला संघ बनण्याचा मान मिळवला आहे. शिवाय, वानखेडे स्टेडियमवर आपले वर्चस्व कायम राखण्यातही त्यांना यश आले आहे. त्याचबरोबर 221 धावांचा यशस्वी पाठलाग हा मुंबईचा आयपीएल इतिहासातील धावांचा सर्वात मोठा पाठलाग ठरला आहे.
