नोटीस बजावून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न
| पनवेल । विशेष प्रतिनिधी |
शहर विद्रुपीकरण केले म्हणून केले म्हणून पालिकेचे अतिक्रमन विभाग एकीकडे विना परवानगी जाहिराती करणार्या सामान्य जाहिरातदारांवर कारवाई करते. मात्र, त्याच वेळी नियमानुसार शासनाच्या परवानग्या न घेता उंच जाहिरात फलक उभारणार्या जाहिरात कंपनीला मात्र नोटीस बाजावून अभय देण्याचे काम पालिकेचा परवाना विभाग करत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.
पालिका जाहिरात फलक उभरण्यासाठी रोनक अॅडव्हर्टायझिंग या जाहिरात कंपनीची नेमणूक पालिका प्रशासनाने केली आहे. पालिकेने आखून दिलेल्या नियम आणि अटींची पूर्तता करूनच या कंपनीने पालिका हद्दीत जाहिरात फलक उभारावेत, अशी अट ही नेमणूक करताना करण्यात आली आहे. पालिकेने दिलेल्या अटी-शर्तींनुसार संबंधित कंपनीने जाहिरात फलक उभरण्यापूर्वी शासनाच्या लागणार्या परवानग्या घेणे बंधनकारक मात्र, पालिकेसोबत करण्यात आलेल्या करारनुसार शासनाच्या परवानग्या घेणे आवश्यक असतानाही पालिकेने नेमलेल्या कंपनीने सायन-पनवेल महामार्गावरील वाहतूक विभागाच्या कार्यालयासमोरील सेवा रस्त्यावर 25 बाय 25 या आकारातील जाहिरात फलक उभारण्यात आला आहे.
ज्या ठिकाणी हा फलक उभरण्यात आला आहे, त्या ठिकाणी जमिनीखालून विविध कंपन्याच्या गॅस वाहिन्या टाकण्यात आलेल्या असून, नवी मुंबई जलवाहिनीदेखील या ठिकाणी आहे. यामुळे या ठिकाणी जाहिरात फलक उभारण्यापूर्वी संबंधित सर्व विभागाच्या परवानग्या घेणे बंधनकारक होते. मात्र, असे न करता जाहिरात फलक उभारणार्या कंपनीने या ठिकाणी फलक उभारून पालिकेच्या कराराचे उल्लंघन केले आहे. याबाबतची माहिती परिसरातील काही समाजसेवकांनी पालिका प्रशासनाला दिली असता खडबडून जागे झालेल्या पालिकेच्या परवाना विभागाने गडबडीत फलक उभारणार्या कंपनीला नोटीस बजावत लागणार्या सर्व परवानग्या घेण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र, ही नोटीस बजावत असताना परवानगीशिवाय फलक उभारून नियम भंग केल्याबाबत कोणतीही कारवाई करण्याचे संकेत नोटीसीत नसल्याने पालिका प्रशासन जाहिरात दार कंपनीला पाठीशी घालत असल्याचे पाहायला मिळत आहे.
पोलिसांच्या सूचनेकडे दुर्लक्ष
महामार्गालगत असलेले जाहिरात फलक स्वरूपाचे असल्यास वाहनचालकांचे लक्ष विचलित होऊन अपघात घडण्याची शक्यता असते. हे लक्षात घेत कळंबोली वाहतूक शाखेसमोर उभारण्यात आलेला जाहिरात फलक अप्रकाशित स्वरूपाचा असावा, अशी सूचना वाहतूक पोलिसांनी केली आहे. पालिकेच्या परवाना विभागाने मात्र या सुचनेकडे दुर्लक्ष करत प्रकाशित जाहिरात फलक उभारण्याची परवानगी दिली आहे.
अपघाताची शक्यता मान्य
कळंबोली येथे ज्या ठिकाणी जाहिरात फलक उभारण्यात आला आहे. प्रकाशित स्वरूपाच्या असलेल्या या फलकाखाली विविध कंपन्याच्या गॅस वाहिन्या टाकण्यात आल्या आहेत. भविष्यात या वाहिन्यांना गळती लागून अपघात होण्याची शक्यता पालिकेने बजावलेल्या नोटीस मध्ये वर्तवण्यात आली आहे. पालिकेने यामुळे एक प्रकारे दुर्घटना घडण्याची शक्यता मान्य केली आहे.
गॅस कंपन्याचा ना परवाना आवश्यक
गॅस वाहिन्या टाकण्यात आलेल्या जमिनीवर कोणत्याही प्रकारचे खोदकाम करताना गॅस कंपन्याकडून ना हरकत प्रमाणपत्र घेणे बंधनकारक आहे. भविष्यात खोदकाम करण्यात आलेल्या ठिकाणी वाहिन्यांमध्ये बिघाड झाल्यास खोदकाम करून करण्यात आलेले बांधकाम स्वतः निष्काशीत करू अशा आशयाचे शपथ पत्रदेखील संबंधित गॅस कंपनी खोदकाम करण्यापूर्वी संबंधिताकडून घेते. जाहिरात फलक उभारणार्याने अशा कोणत्याही प्रकारचे शपथ पत्र गॅस कंपन्यांना दिले नसल्याची माहिती गॅस कंपन्याच्या अधिकार्यांनी दिली आहे.
परवानगीआधीच व्यावसायिक वापराला सुरुवात
परवाना नसतानाही बेकायदेशीर उभारण्यात आलेल्या फलकाचा व्यावसायिक वापर करण्यास सुरवात करण्यात आल्याने संबंधित कंपनीविरिधात काय कारवाई केली जाणार, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.