| पनवेल | वार्ताहर ।
महानगरपालिकेच्या जाचक करप्रणाली विरोधात महाविकास आघाडी काढणार येत्या 13 मार्चला महामोर्चा काढणार आहे. महाविकास आघाडीने यापूर्वी ठिय्या आंदोलन करून या विषयाला वाचा फोडली होती. आंदोलनादरम्यान आश्वासने देत चालढकल करणार्या महानगरपालिकेला धडा शिकविण्यासाठी महाविकास आघाडीने कंबर कसली आहे प्रतिपादन महाविकास आघाडीचे नेते माजी आ.बाळाराम पाटील यांनी गुरुवारी बैठकीत करताना केले.
पनवेलच्या ज्येष्ठ नागरिक सभागृहांमध्ये या मोर्चाच्या आयोजनासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला बबन पाटील, शिरीष घरत, प्रशांत पाटील, सुदाम पाटील, कांतीलाल कडू, माजी नगराध्यक्ष जे एम म्हात्रे, आर सी घरत, शिरीष बुटाला, माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, सतीश पाटील, दीपक घरत, शशिकांत डोंगरे, ज्ञानेश्वर बडे, कांबळे, शशिकांत बांदोडकर, कॅप्टन कलावत, नारायण घरत, काशिनाथ पाटील, फारुख पटेल, मल्लिनाथ गायकवाड, मा नगरसेवक गणेश कडू, रवींद्र भगत, महादेव वाघमारे यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक, सामाजिक संस्था, व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना पाटील यांनी सांगितले कि, पनवेल महानगरपालिका करप्रणालीच्या बाबतीत हुकूमशाही पद्धती अवलंबत आहे. अन्यायकारक कराचा बोजा पनवेलच्या नागरिकांवर लादू देणार नाही अशी आमची ठाम भूमिका आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या वतीने महामोर्चा काढणार असून यासाठी जास्तीत जास्त संख्येने नागरिकांनी उपस्थित राहून भाजपप्रणित महानगरपालिकेचा निषेध करावा असे सांगितले. याबैठकीला अनेकांनी आपल्या भूमिका मांडताना भाजपप्रणीत महानगरपालिकेचा निषेध केला.