नगरपरिषद कंत्राटी कामगार गंभीर जखमी

। माथेरान । वार्ताहर ।

माथेरान नगरपरिषदेच्या सफाई विभागातील ठेकेदाराचा कंत्राटी कामगाराला गटारांची साफसफाई करताना डोक्याला लोखंडी अँगल लागल्याने गंभीर दुखापत झाली आहे.

महात्मा गांधी मार्गाच्या मुख्य रस्त्यावर पार्क व्ह्यू हॉटेल धारकाने त्याच्या हॉटेलच्या कंपाउंडला हॉटेलचे जाहिरात फलक लावण्यासाठी तसेच रस्त्यालगत नगरपरिषदेच्या गटारावर कुणीही टपरी लावून नये या उद्देशाने काही दिवसांपूर्वी तिथे लोखंडी अँगल लावलेले आहेत. बुधवारी (दि.31) कंत्राटी कामगार बुधाजी नारायण पारधी गटारात उतरून प्लास्टिक तसेच अन्य कचरा गोळा करत असताना त्यांच्या डोक्याला लोखंडी अँगल लागल्याने रक्तस्राव होऊ लागला. त्यावेळी तेथे उपस्थित नगरपरिषदेचे मुकादम अर्जुन पारधी यांनी बुधाजी या जखमी कामगाराला नगरपरिषदेच्या दवाखान्यात दाखल केले. बुधाजी यांच्या डोक्याला चार टाके लावण्यात आले आहेत.

नगरपरिषदेच्या रस्त्यावर गटारालगत आजही अनेकांनी पत्र्याचे कंपाउंड केले आहे. त्यामुळे साफसफाई करताना कंत्राटी कामगारांना ते त्रासदायक ठरत आहे. ही बाब नगरपरिषदेच्या निदर्शनास आणून देण्यात आली असनही याकडे दुर्लक्ष झाल्याने अशाप्रकारे अपघात होण्याची यापुढेही शक्यता नाकारता येत नाही. लोखंडी अँगल त्याचप्रमाणे पत्र्याचे अतिक्रमित कंपाउंड काढून टाकण्यात यावेत, असे स्थानिकांमधून बोलले जात आहे.

बुधाजी पारधी याला दुखापत झाल्यावर आम्ही ताबडतोब दवाखान्यात दाखल केले. तेथे प्राथमिक उपचार करण्यात आले असून त्याला विश्रांती करण्यास सांगितले आहे. जेवढे दिवस कामावर येणार नाही तेवढ्या दिवसांचे पैसे संबंधीत ठेकेदारला देणार आहेत.

अर्जुन पारधी, मुकादम माथेरान नगरपरिषद
Exit mobile version