स्वच्छता फी आकारण्यास सुरुवात
| आगरदांडा | प्रतिनिधी |
पावसाळी हंगामात बंद असलेला कर वसुली नाका शुक्रवारपासून सुरु करण्यात आला आहे. मुरुड शहर हे पर्यटन स्थळ असल्याने आता लवकरच पर्यटन हंगाम सुरु होणार असल्याने नगरपरिषदेकडून पर्यावरण नियंत्रण व स्वच्छता फी आकारणी सुरु करण्यात आली आहे. मागील चार महिन्यांपासून ही कर आकारणी बंद होती. त्यामुळे नगरपरिषदेच्या उत्पन्नात मोठी घट झाली होती. या वसुलीचा ठेका कोणालाही देण्यात आलेला नाही. नगरपरिषदेचे कर्मचारी ही फी आकारणी वसूल करीत आहेत.
सुप्रसिद्ध जंजिरा व पद्मदुर्ग किल्ला अथवा मुरुड समुद्र किनारा पहाण्यासाठी शहराच्या प्रवेशद्वारातून यावे लागते. यासाठी एक खास टोल नाका तयार करण्यात आला असून, नगरपरिषद ही फी आकारणी करीत आहे. पर्यावरण नियंत्रण व स्वच्छता फी मध्ये कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. जे पूर्वीचे दर आहेत तेच दर कायम ठेवण्यात आले आहेत. सध्या मुरुड नगरपरिषदेकडून मोठी बस 300 रुपये, मिनी बस 200 रुपये, लहान चार चाकी गाडी 100 रुपये आकारले जात आहेत. त्यामुळे यंदा कोणतीही वाढ न झाल्याने पर्यटकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
हा कर वसूल करण्यासाठी मुरुड नगरपरिषदेचे कर्मचारी नितेश माळी, सीताराम पतेने, संजय विरकुड व सचिन सुभेदार हे सेवा बजावत आहेत. याबाबत मुरुड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी पंकज भुसे यांनी सांगितले की, मागील चार महिन्यांपासून पावसाळी हंगाम असल्याने हा कर घेणे बंद होते. परंतु, आता पावसाळा संपला असून, पर्यटकसुद्धा येण्याचे प्रमाण वाढणार आहे. या कर वसुलीमुळे नगरपरिषदेच्या उत्पन्नात वाढ होणार असून, विविध विकासकामे करण्यासाठी मोठी मदत होणार आहे.