| विरार | प्रतिनिधी |
गणेश विसर्जनावेळी पाण्यात बुडून मृत्यू झाल्याच्या अनेक घटना राज्यभरात घडल्या आहेत. विरारमध्ये महापालिकेने नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्याचाच पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. फिट आल्याने 24 वर्षांचा तरुण पाण्यात पडला. त्यानंतर तो बुडून मृत्यूमुखी पडला. विरार पूर्वला असलेल्या टोटाळे तलावात ही घटना घडली.
याबाबत मिळालेली माहिती असी की, अमित सतीश मोहिते याला वसई विरार पालिकेने गणेश विसर्जनासाठी नियुक्त केले होते. गणेश विसर्जनासाठी तो टोटाळे तलावत होता. बुधवारी पहाटे गणेश विसर्जन सुरू असताना अमितला फिट आली आणि तो पाण्यात बुडाला. यात अमितचा मृत्यू झाल्याने त्याच्या कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. विसर्जनासाठी नागरिकांची गर्दी होती. तसेच पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता. याशिवाय पालिकेची कर्मचारीसुद्धा टोटाळा तलावात होते. पण अमित पाण्यात पडल्यानंतर त्याला वाचवता आले नाही. यामुळे कुटुंबियांसह नातेवाईकांनी तीव्र संताप व्यक्त केला. पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून अधिक तपास करीत आहे.