गाळ काढण्यासाठी करणार खर्च
। पनवेल । वार्ताहर ।
भरतीच्या पाण्यापासून वसाहतीला वाचवण्यासाठी कळंबोली वसाहती मध्ये तयार करण्यात आलेल्या धारण तलावाचा (होल्डिंग पाँड)विकास करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. या करता पालिका प्रशासन 116 कोटी रुपये खर्च करणार असून, धारण तलावतील गाळ काढला जाणार असल्याने पावसाळ्यात वसाहतीत पाणी साचण्याच्या घटना देखील या मुळे थांबणार आहेत. प्रशासक म्हणून आयुक्त गणेश देशमुख सध्या पालिकेचा कारभार एकहाती चालवत आहेत. शहरातील समतोल विकासाच्या दृष्टीने वर्षभरात अनेक महत्वपुर्ण निर्णय घेण्यात आले आहे. नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण बैठकीत खारघर, कलंबोली आणि नवीन पनवेलमधील रस्ते विकासासाठी 305 कोटींची तरतुद करून नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न केले. याच बैठकीत आणखी एक महत्वपुर्ण निर्णय घेवून महापालिका प्रशासनाने कळंबोलीकरांना गणेशउत्सवाची मोठी भेट दिली आहे.
कांदळवन तयार होईपर्यंत अनेक वर्षे सिडकोने दुर्लक्षित केलेल्या कळंबोलीच्या होल्डिंग पॉन्डचा विकास करण्यासाठी महापालिकेने 116 कोटी रूपयांचा निधी खर्च करण्याचा निर्णय घेतला आहे. कळंबोलीचा होल्डींग पॉन्डकडे सिडको प्रशासनाने वर्षांनुवर्षे दुर्लक्ष केल्यामुळे होल्डिंग पॉन्डमध्ये कांदळवने निर्माण झाली आहे. शहरातून बाहेर पडणाऱ्या पावसाळी पाण्याचा निचरा करण्यासाठी आवश्यक असलेल्या पॉन्डमध्ये गाळ साठलेला आहे. पाणि निचरा होण्यासाठी अडथळे निर्माण होवून पावसाळ्यात कळंबोलीतील पाण्याचा निचरा योग्य पध्दतीने होत नाही. होल्डींग पॉन्ड व स्टॉर्म वॉटर ड्रेन नेटवर्क सिस्टिमचा अभ्यास करण्यासाठी महापालिकेने सल्लागार कंपनीची नियुक्ती केली होती.
कांदळवनाचा अडथळा होल्डिंग पॉन्डचा विकास करताना महापालिकेला सीआरझेडचा अडथळा येणार आहे. पॉन्डमध्ये वाढलेल्या मँग्रोजची हानी न होता काम करावे लागेल. तसेच उच्च न्यायालयासह विविध विभागांच्या परवानगी घेणे आवश्यक असल्यामुळे सीआरझेड, मॉफ, उच्च न्यायालयातील प्रक्रिया पुर्ण करण्यासाठी कंत्राट कालावधीमध्ये परवानग्या मिळविण्यासाठी ठेकेदाराला सहा महिन्यांचा अवधी दिला जाणार आहे. याशिवाय होल्डिंग पॉन्डमधील गाळ काढण्यासाठी वेगळ्या सहा महिन्यांची मुदत ठेकेदाराला देण्याचा निर्णय घेतला आहे.
कळंबोलीकरांची गरज ओळखून पावसाळी पाण्याचा निचरा करण्यासाठी सर्वप्रथम होल्डिंग पॉन्डचा विकास करण्याचा निर्णय घेतला. तळमजल्यावर राहणाऱ्या नागरिकांच्या घरात पाणि साठण्याची समस्या कायमस्वरूपी मिटविण्याचा आमचा प्रयत्न आहे.
गणेश देशमुख, प्रशासक, पनवेल महापालिका
निर्णयाचे स्वागत. कळंबोली वसाहत समुद्रसपाटीपासून खाली असल्यामुळे पावसाळी पाण्याचा निचरा सुरळीतपणे होत नाही. सिडकोकडे अनेक वर्षे पाठपुरावा करूनही न होवू शकलेली बाब महापालिकेने केली. ही बाब कळंबोलीकर नागरिक म्हणून स्वागतार्ह आहे. कळंबोलीकरांकडून प्रशासकांचे अभिनंदन.
रविंद्र भगत, माजी नगरसेवक, शेकाप