| पनवेल | प्रतिनिधी |
20 मार्च रोजी साजरा होणाऱ्या जागतिक चिमणी दिनाच्या पार्श्वभूमीवर सायन-पनवेल महामार्गावरील कलंबोली पुलावर आकर्षक भित्तीचित्र साकारण्यात आले आहे. चिमणी-चिमण्यांचे पाण्यात खेळणारे सुंदर चित्र नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे. पर्यावरणातील बदल, वाढते शहरीकरण, मोबाईल टॉवरचे प्रमाण आणि झपाट्याने कमी होत चाललेली झाडे यामुळे चिमण्यांची संख्या दिवसेंदिवस घटत आहे. एकेकाळी प्रत्येक घरट्यात, अंगणात दिसणारी चिमणी आता दुर्मिळ होत चालली आहे. या पार्श्वभूमीवर कलंबोली पुलावरील भित्ती चित्रातून पक्षी संवर्धनाचा आणि पर्यावरण संरक्षणाचा प्रभावी संदेश देण्यात आला आहे. वाहनचालक आणि पादचारी या चित्राकडे पाहून थोडा वेळ थांबत असून, अनेकजण छायाचित्रेही घेत आहेत. चिमण्यांसाठी घरटी लावणे, पाण्याची भांडी ठेवणे आणि झाडे लावणे यासारख्या छोट्या उपक्रमातून त्यांचे अस्तित्व जपण्याचे आवाहन पर्यावरणप्रेमींनी केले आहे.







