धक्कादायक! अनैतिक संबंधातून काढला काटा;प्रेयसीवरही संशय

सात वर्षापुर्वी झालेल्या गुन्ह्याचा तपास दोन महिन्यात उघडकीस
| अलिबाग | प्रतिनिधी |
अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकी चालक जागीच ठार झाला होता. ही घटना 2016 रोजी घडली होती. हा अपघात नसून घात असल्याचा संशय निर्माण झाल्याने रायगड पोलिसांनी सात वर्षापुर्वीचा अपघात बनावट असल्याचे सिध्द करून खून केल्याचा गुन्हा उघडकीस आणला. अवघ्या दोन महिन्यात या गुन्ह्याची उकल करण्यास पोलिसांना यश आले.

समोद महादेव शेडगे असे या मयताचेे नाव आहे. हा इसम त्याच्या दुचाकीवरून 7 ऑगस्ट 2016 रोजी महाड-पंढरपूर रस्त्याने बोरगाव ते चांडवे असा प्रवास दुचाकीवरून पत्नीसमवेत रात्रीच्यावेळी प्रवास करीत होता. एका अज्ञात वाहनाच्या धडकेत तो गंभीर जखमी होऊन मृत झाला. त्याच्या पत्नीने दुचाकीवरून उडी मारल्याने तिचा जीव वाचला.

याबाबत मोटार अपघात नोंद करून मयताच्या पत्नीचा जबाब, पंचनामा महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात घेण्यात आला होता. मात्र समोद याची आई सरिता शेडगे यांनी हा अपघात संशयास्पद असल्याचे व्यक्त करीत मानवी हक्क आयोगाकडे याबाबत याचिका दाखल केली होती. या गुन्ह्याचा तपास पुन्हा करण्यात यावा, असे आदेश मानवी हक्क आयोगाकडून देण्यात आले. त्यानुसार रायगडचे अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांच्याकडे जून 2023 पासून या गुन्ह्याचा तपास आला. त्यांच्या मार्गदर्शनानुसार वेगवेगळ्या तांत्रिक बाबीचा विचार करून तपास करण्यात आला. मयत समोद शेडगे यांचा मोबाईल सात वर्षांनी पोलीसांनी शोधून काढला. तो मोबाईल आरोपीच्या मित्राकडे सापडला. त्यामुळे पोलीसांचा संशय अधिक बळावल्याने त्यांनी तातडीने संदीप कळंबे याला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केल्यावर त्यानेच खून केल्याचे कबूल केले.

अपघात झाल्याचे दाखवून डोक्याला गंभीर दुखापत होऊन शेडगे मयत झाल्याचे चित्र दाखविण्यात आले होते. अनैतिक संबंधातून हा घात केल्याचे समोर आले असून यामध्ये मयताच्या पत्नीचाही संशय समोर येत आहे. पोलीस निरीक्षक संजय पाटील, पोलीस निरीक्षक मारुती आंधळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे, पोलीस उपनिरीक्षक विशाल शिर्के, विक्रांत फडतरे, पोलीस हवालदार संजय साळवी, अरुण घरत, सागर अष्टमकर, महिला पोलीस अभियंती मोकल यांचे या गुन्ह्याच्या तपासात योगदान राहिले.

Exit mobile version