| खोपोली | प्रतिनिधी |
जमिनीच्या वाटणीवरून सुरू असलेल्या वादाचे पर्यवसान मारहाणीत होऊन 55 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शनिवारी (दि.19) सकाळी निगडोली गावाच्या परिसरात घडली. आसरे चौक येथील लक्ष्मण पांडू डुकरे असे मृत व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी त्यांची पनवेल येथील बहीण रोहिणी भगवान पाटील आणि दीपक पाटील यांना ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लक्ष्मण डुकरे आणि त्यांची बहीण रोहिणी यांच्यात जमिनीच्या वाटणीवरून काही दिवसांपासून वाद सुरू होता. आठवडाभरापूर्वीही दोघांमध्ये बाचाबाची आणि हाणामारीचा प्रकार घडला होता. शनिवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास रोहिणी पाटील आणि दीपक पाटील हे निगडोली येथील लक्ष्मण यांच्या शेतघरावर आले होते.
यावेळी जमिनीच्या वादातून पुन्हा त्यांच्यात वाद झाला. वादाचे रूपांतर मारहाणीत झाले. रोहिणी आणि दीपक यांनी लक्ष्मण यांना मारहाण केल्याचा आरोप आहे. वडिलांना वाचविण्यासाठी त्यांचा मुलगा जयेंद्र मध्ये पडला असता त्यालाही मारहाण करण्यात आली. या मारहाणीत लक्ष्मण यांना जोराचा फटका बसल्याने ते जमिनीवर निपचित पडले. त्यांना तातडीने चौक येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह शवविच्छेदनासाठी चौक ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला. खालापूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. विशाल नेहुल आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंगटे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. मृत लक्ष्मण यांचा मुलगा जयेंद्र याच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, रोहिणी पाटील आणि दीपक पाटील यांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास खालापूर पोलीस करीत आहेत. सणासुदीच्या काळात घडलेल्या या घटनेने आसरे परिसरावर शोककळा पसरली आहे.



