। दांडगुरी । वार्ताहर ।
श्रीवर्धन तालुक्यातील दिघी ग्रामपरिसरात शुल्लक कारणाच्या आधारावर दारूच्या नशेत मित्राची हत्या केल्याची घटना घडली आहे. दिवाळीच्या अदल्याच दिवशी ही घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिघी गावातील कोळीवाडा येथे राहणारे कृष्णा माया खेळोजी (55) व तुकाराम कमलाकर कावळे (42) हे दोघेही मच्छिमार बोटीवर कामाला होते. या दोघांमध्ये शुल्लक कारणावरुन शाब्दिक बाचाबाची झाली होती. हा वाद इतर साथीदारांच्या मध्यस्थीने सोडवण्यात आला होता. मात्र, कृष्णा खेळोजीच्या डोक्यातील राग शांत झाला नव्हता.
दिवाळीच्या अदल्या दिवशी आरोपी कृष्णा खेळोजीने तुकारामला आपल्या घरी नेले. सोबत दारु प्यायल्यानंतर रात्री 11 वाजण्याच्या सुमारास घरासमोरच कृष्णा खेळोजीने तुकाराम यांच्यावर चाकूने वार करत त्याची हत्या केली. त्यानंतर खेळोजीने गावच्या प्रमुख मंडळींना तुकाराम आपल्या घरासमोर पडला असल्याचे सांगत बनाव रचला. मात्र, या घटनेचा प्रत्यक्ष साक्षीदार असल्याने, आरोपी अयशस्वी ठरला. याप्रकरणी, तुकाराम कावळे यांच्या पत्नीने फियाद दिली असून, यानुसार दिघी सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.