| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार, मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम आयोजित केला आहे. हा कार्यक्रम दि.30 जून ते 7 ऑक्टोबर या कालावधीत राबविला जाणार आहे. मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत मतदारांची मॅपिंग केली जाणार असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी मुकेश चव्हाण यांनी दिली.
रायगड जिल्ह्यातील सात विधानसभा मतदार संघापैकी अलिबाग विधानसभा मतदार संघातील दि.22 जून पर्यंतच्या मतदारांची संख्या 3 लाख 9 हजार 580 इतकी आहेत. आतापर्यंत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी अर्थात बीएलओ मार्फत 2 लाख 38 हजार 741 मतदारांची मॅपिंग करण्यात आली आहे. त्यामुळे 70 हजार 839 मतदारांची मॅपिंग शिल्लक राहिली आहे. दि.30 जून ते 29 जूलै या कालावधीत मतदान केंद्रस्तरिय अधिकारी यांच्या मार्फत घरोघरी भेटी घेतल्या जाणार आहे. आयोगाकडून प्राप्त झालेल्या इन्युमरेशन फॉर्ममध्ये मतदारांची माहिती भरून घेण्यात येणार आहे. ज्या मतदारांचे मॅपिंग झाले नाही, अशा मतदारांकडून निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आलेल्या कागदपत्रांपैकी तीन दाखले पुरावा म्हणून घेण्यात येणार आहेत. त्यानंतर मतदान केंद्राचे सुसत्रीकरण केले जाणार आहे.
अलिबाग विधानसभा मतदार संघात सध्याच्या स्थितीत 375 मतदान केंद्र आहेत. 39 मतदान केंद्रावर 1 हजार 200 किंवा त्यापेक्षा अधिक मतदार आहेत. त्यांचे विभाजन केले जाणार आहे. त्यामुळे 414 मतदान केंद्र वाढणार आहेत. दि.5 ऑगस्टपर्यंत प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. दि.4 सप्टेंबरपर्यंत त्यावर दावे व हरकती दाखल करण्याची संधी उपलब्ध केली जाणार आहे. त्यानंतर दि.7 ऑक्टोबरला अंतिम मतदान यादी प्रसिद्ध केली जाणार असल्याचे मुकेश चव्हाण यांनी सांगितले.







