| धाटाव | प्रतिनिधी |
रोहा-अष्टमी नगरपालिकेने पाणीपट्टी दरात मोठी वाढ केली आहे. ही दरवाढ सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला परवडणारी नाही. म्हणून वाढीव पाणीपट्टी दरवाढ तातडीने रद्द करा, अशी मागणी शिवसेना (उबाठा) गटाने केली आहे. आधीच महागाईने होरपळत असलेल्या जनतेवर हा अतिरिक्त आर्थिक बोजा टाकल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र असंतोष आहे. या प्रकरणावर सोमवारी (दि.22) रोहा अष्टमी नगरपालिकेच्या परिसरात रोह्यातील ठाकरे शिवसेना चांगलीच आक्रमक झाली असून आमरण उपोषणाचे हत्यार उपसून आंदोलनाला बसले आहेत. याठिकाणी शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करीत शक्तीप्रदर्शन सुद्धा केले आहे.
रोहा अष्टमी नगरपालिकेच्या मते, वीजबिलातील वाढ, कर्मचाऱ्यांचे वेतन, देखभाल दुरुस्ती खर्च आणि पाणीपुरवठा विभाग तोट्यात असल्याने ही वाढ करणे आवश्यक होते. शासनाने सुचवलेल्या वार्षिक 3,600 रुपयांच्या वाढीपेक्षा कमी म्हणजेच 2,800 रुपये दर निश्चित केल्याचा दावा नगरपालिकेने केला आहे. मात्र, शिवसेनेने ही वाढ पूर्णपणे अन्यायकारक असल्याचे म्हणत ती मागे घेण्याची मागणी केली आहे. महाड नगरपालिकेत 1100, श्रीवर्धन 1200, मुरुड 1500, अलिबाग 860, खोपोली 1300, कर्जत 1500 उरण 2000, पेण 1200 मग फक्त रोहेकरांसाठीच 2800 रुपयांचा भार का? यासाठी शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेत ठाकरे सेनेचे रोहा शहरप्रमुख राजेश काफरे यांच्या नेतृत्वाखाली चंद्रकांत कडू, प्रीतम देशमुख आणि इतर प्रमुख पदाधिकाऱ्यांनी या वाढीव पाणीपट्टीविरोधात तीव्र आंदोलन उभारले आहे.
उपोषणादरम्यान पाणी पुरवठा सभापती महेंद्र दिवेकर यांनी प्रशासनाची बाजू ऐकून घेण्याची शिवसैनिकांना विनंती केली. त्यानंतर कै. द.ग. तटकरे सभागृहात दोन्ही बाजूने सकारात्मक चर्चा झाली. सभापती दिवेकर व मुख्याधिकारी एडके यांनी योजने साठी जमा खर्च अहवाल सादर केला. यावेळी नगर पालिकेचे मुख्याधिकारी अजय कुमार एडके, अहमद दर्जी, सभापती महेंद्र दिवेकर, रविंद्र चाळके, महेश कोलटकर, नीता हजारे, महेंद्र गुजर, अजित मोरे, प्रशांत कडू, अरबाज मनेर, समीर शेडगे, प्रेषित बारटक्के, स्वप्नील धनावडे आदी उपस्थित होते. या बैठकीत तोडगा न निघाल्याने शहर प्रमुख राजेश काफरे व अन्य शिवसैनिक आपल्या उपोषणावर ठाम असल्याचे सांगण्यात आले.







