सहकारी संघाच्या विशेष बैठकीत तीव्र नाराजी
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
आंतरराष्ट्रीय युद्धजन्य परिस्थितीमुळे डिझेलच्या दरातील तफावत प्रति लिटर 55 रुपयांपर्यंत पोहोचली आहे. इंधनावरील प्रचंड खर्चामुळे मच्छीमार अक्षरशः मेटाकुटीला पोहोचला असून, मासेमारी व्यवसायाच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शासनाच्या या भूमिकेविरोधात मच्छिमार संघ आक्रमक झाले असून, महाराष्ट्र राज्य मच्छीमार सहकारी संघाच्या विशेष बैठकीत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. मच्छिमारांसाठी स्वतंत्र विशेष डिझेल प्रवर्ग निर्माण करून सवलतीच्या दरात इंधन उपलब्ध करून द्यावे, मच्छीमारांना रिटेल कॅटगरी प्रमाणेच डिझेलचा पुरवठा करण्यात यावा, अशी एकमुखी मागणी बैठकीत करण्यात आली.
महाराष्ट्र राज्य मच्छीमार सहकारी संघ मर्यादित, मुंबई यांच्या अध्यक्षा ज्योती मेहेर यांच्या अध्यक्षतेखाली संघाचे सागरी संचालक मंडळासह, संपूर्ण कोकण किनारपट्टीवरील मच्छीमार सहकारी संस्थांची विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी रामदास संधे, ॲड. जे.टी. पाटील, विजय गिदी, जयकुमार भाई, राजेंद्र मेहेर, अर्पिता कोळी, उल्हास वाटकरे, सिराज डोसानी, तुलसी गोहिल व दामोदर चामुडिया आदी मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी मच्छीमारांना कन्जुमर कॅटेगरीमध्ये समाविष्ट केल्यामुळे सातत्याने वाढणाऱ्या डिझेल दरांमुळे मच्छीमार व्यवसाय गंभीर संकटात सापडल्याची भावना व्यक्त करण्यात आली. किरकोळ ग्राहकांना मिळणाऱ्या डिझेल दरापेक्षा कन्जूमर कॅटेगरीमधील दर प्रति लिटर साधारणतः 20 ते 25 रुपयांपेक्षा अधिक आकारला जात आहे. मागील 4 ते 5 महिन्यांपासून सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय युद्धजन्य परिस्थितीमुळे या दरातील तफावत 55 रुपयांपर्यंत पोहोचले. त्यामुळे इंधनावरील प्रचंड खर्चामुळे मच्छीमार अक्षरशः मेटाकुटीला पोहोचला असून, मासेमारी व्यवसायाच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मच्छीमारांसाठी स्वतंत्र विशेष डिझेल प्रवर्ग निर्माण करून सवलतीच्या दरात इंधन उपलब्ध करून द्यावे, तसेच मच्छीमारांना प्रमाणेच डिझेलचा पुरवठा करण्यात यावा, अशी मागणी बैठकीत करण्यात आली.डिझेलच्या दरवाढीमुळे मच्छिमार संघामध्ये तीव्र संताप निर्माण झाला असून, त्यांनी शासनाच्या भुमिकेविरोधात नाराजी व्यक्त केली आहे. शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही, तर आगामी काळात तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशाराही देण्यात आला.






