दारूच्या नशेतून एकाची हत्या

| पनवेल | प्रतिनिधी |

पनवेल शहरातील नानासाहेब धर्माधिकारी उड्डाणपूल परिसरात दारूच्या नशेत झालेल्या भांडणातून एका व्यक्तीची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. विजय (पूर्ण नाव अद्याप जाहीर नाही) या व्यक्तीचा मृतदेह उड्डाणपुलाखाली आढळून आला होता. या प्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाणे यांनी आरोपीला अटक केली आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 17 फेब्रुवारी रोजी सकाळच्या सुमारास उड्डाणपुलाखाली एक व्यक्ती रक्ताच्या थारोळ्यात पडलेली असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. घटनास्थळी दाखल झाल्यानंतर पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला व शवविच्छेदनासाठी पाठवला. तपासात मृताची ओळख विजय अशी पटली.

या घटनेचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला. तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी तसेच गोपनीय बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीद्वारे पोलिसांनी संशयित सिताराम रामू यादव उर्फ बाहुबली (39) याचा शोध घेतला. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, दारू प्यायल्यानंतर किरकोळ कारणावरून विजयसोबत त्याचे भांडण झाल्याची कबुली त्याने दिली. वाद चिघळल्यानंतर संतापाच्या भरात आरोपीने विजयच्या डोक्यात दगड घालून गंभीर मारहाण केली. या मारहाणीत विजयचा घटनास्थळीच मृत्यू झाला, अशी माहिती तपासात पुढे आली आहे.या प्रकरणी खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला न्यायालयात हजर केले असता सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपास महाराष्ट्र पोलीस यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Exit mobile version