मुरूड-चौल एसटी सेवा सुरु करावी: चित्रलेखा पाटील


। अलिबाग । प्रतिनिधी ।

उच्च शिक्षणासाठी रेवदंडयामध्ये येणार्‍यांची संख्या वाढू लागली आहे. तळेखारपासून शेकडो विद्यार्थी रेवदंड्यात शिक्षणासाठी येतात. परंतु एसटी अभावी अनेक विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे मुरूड आगारातून सुपेगाव मार्गे चौल एसटी खास विद्यार्थ्यांसाठी सुरु करण्यात यावी, अशी मागणी शेकापच्या महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांनी केली आहे. याबाबत मुरूड आगार व्यवस्थापक राहूल शिंदे यांना निवेदन देण्यात आले आहे.

मुरूड, रोहा, अलिबाग तालुक्यातील अनेक गावे, वाड्यांमधील विद्यार्थी रेवदंड्यामध्ये उच्च शिक्षणासाठी येतात. तळेखार, सावरोली, चोरढे, ताडवाडी, ताडगाव, सातीर्डे, वळके, येसदे, आंबली, मिठेखार, चेहेर, नवे चेहेर, निडी, साळाव येथील दोनशेहून अधिक प्रवासी रेवदंड्यात उच्च शिक्षणासाठी जातात. परंतु एसटी अभावी या मार्गावरील विद्यार्थ्यांनी मोठी गैरसोय होत आहे. अनेक वेळा या विद्यार्थ्यांना शाळा, कॉलेजमध्ये वेळेवर पोहचता येत नसल्याने शिक्षणापासून वंचि राहण्याची वेळ येत आहे. शेकापच्या महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांच्या ही बाब लक्षात आली. त्यांनी घटनेचे गांभीर्य ओळखले. ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी तळेखारपासून रेवदंड्याकडे येणार्‍या विद्यार्थ्यांसाठी मुरूड आगारातून सुपेगाव मार्गे चौल बस सेवा सुरु करावी अशी मागणी मुरूड आगाराकडे केली आहे. सकाळी सहा वाजता मुरूडमधून ही बस सुरु करावी, असे निवेदनातून सांगण्यात आले आहे.

दोन्ही आगारातील व्यवस्थापक यांच्याशी चर्चा करून विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी बस सेवा सुरु करण्याचा प्रयत्न केला जाईल.

– दिपक घोडे, विभाग नियंत्रक, रायगड
महाराष्ट्र राज्य परिवहन एसटी महामंडळ

Exit mobile version