सलग सुट्ट्यांनी मुरुड हाऊसफुल्ल

गुलाबी थंडीत पर्यटकांची संख्या वाढली

| मुरुड जंजिरा | वार्ताहर |

मुरुड शहराचा पारा सध्या 18 अंश सेल्सियसच्या खाली घसरला आहे. गुलाबी थंडीचे वातावरण आहे. सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे पर्यटकांनी मुरुडला येणे पसंत केल्याने समुद्रकिनारी मोठी गर्दी दिसून येत आहे. तसेच येथील ताज्या मासळीला पर्यटकांकडून मोठी मागणी असून, खरेदीसाठी झुंबड उडत असल्याचे स्थानिक मासळी विक्रेत्यांकडून सांगण्यात येत आहे.

गुलाबी थंडीत पर्यटनाची मजा लुटण्यासाठी पर्यटक मुरुडमध्ये मोठी गर्दी करताना दिसून येत आहेत. समुद्र शांत असल्याने मासेमारी चांगली होत असल्याने पर्यटक मनसोक्त ताज्या मासळीव ताव मारताना दिसत आहेत. त्याप्रमाणे समुद्रात बोटिंग, घोडागाडी सवारी, पद्मदुर्ग किल्ला सफर सुरू असल्याने पर्यटक आनंद घेत आहेत.

नगरपालिकेने समुद्रकिनारी असलेल्या विश्रामधाम बागेचे नूतनीकरण केल्याने त्याचा लाभ पर्यटकांना होत आहे. पालिकेचे कर्मचारी समुद्रकिनारी दिवसातून तीन वेळा स्वच्छता करतात. मुरुड पासून जवळच असणारे गारंबी धरण, कुडे मांदाड लेणी, खोकरी, दत्तमंदिर या पर्यटन स्थळावर स्वच्छता करून खाण्यापिण्याचे स्टॉल स्थानिकांकडून लावण्यात आल्याचे स्थानिक व्यावसायिकांकडून सांगण्यात येत आहे.


सलग सुट्ट्या असल्याने बुकिंग चांगली आहे. पर्यटकांनी मोठ्या प्रमाणात मुरुडला यावे, आम्ही त्यांना उत्तम सेवा देऊ, हॉटेल भाडेदेखील योग्य दारात घेऊ.

किशोर धामणसाकर, हॉटेल व्यावसायिक

पर्यटकांच्या सेवेसाठी मुरुड तयार आहे. पिण्याचे पाणी, शहरातील रस्ते व समुद्रलकिनार स्वच्छता, याकडे जातीने लक्ष दिल्याने पर्यटकांना त्रास होणार नाही. पर्यटकांनी समुद्रात जाताना भरती-ओहोटी याचे भान ठेवून समुद्राच्या लाटांचा सुरक्षित आनंद घ्यावा.

पंकज भुसे, मुख्याधिकारी, मुरुड नगरपालिका
Exit mobile version