केळघर रस्त्यावर पुन्हा दरड

। रोहा । प्रतिनिधी ।
रोहा, केळघर मार्गे मुरुड रस्त्यावर बुधवारी रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे या मार्गावर गुरुवारी पहाटेच्या सुमारास मोठ्या प्रमाणावर दरडी कोसळल्याने या मार्गावर दरडींचे साम्राज्यच निर्माण झाल्याचे दिसून आले आहे.

रोहा येथून मुरुडकडे जाणार्‍या विविध मार्गांपैकी हा मार्ग सर्वात जवळचा असल्याने या मार्गाला वाहनचालकांची नेहमीच पसंती असते. पण गुरुवारी मोठ्या प्रमाणात या रस्त्यावर दरडी कोसळून रस्त्यावर आल्याने रस्ता वाहतुकीसाठी पूर्णतः बंद झाला होता. या मार्गावरील सुमारे दोन ते तीन किमी मार्ग हा दरडप्रवण क्षेत्र असल्याने या मार्गावर दरवर्षी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर दरडी कोसळत असतात.

मागील वर्षी पावसाळ्यात या मार्गालगत असणार्‍या कवळठे आदिवासी वाडी येथे मातीचा व दगडांचा ढिग कोसळला होता. तसेच रस्ता खचणे, मोरी वाहून जाणे असे प्रकार घडले होते. सदर रस्ता बंद झाल्याने वांदरखोंडा, म्हसाडी, केळघर, कांटी, बोडण, केळघर, गोपाळवट या गावातील नागरिकांना रोह्यात येण्यासाठी भालगाव मार्गे वळसा घालून यावे लागत आहे. या घटनेची माहिती मिळताच सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी घाडगे यांनी जेसीबी व इतर यंत्रसामुग्री यासह घटनास्थळी जावून रस्ता पूर्ववत करण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेतले असून दुपारपर्यंत रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.

Exit mobile version