मुरुड-सुपेगाव एसटी सेवा सुरू

। कोर्लई । वार्ताहर ।

शालेय विद्यार्थ्यांसाठी मुरुड आगारातून सकाळच्या वेळेत सुपेगाव एसटी सेवा सुरू करण्यात आल्याने विद्यार्थीवर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे. एसटी सुरू व्हावी, यासाठी भाजप तालुका उपाध्यक्ष स्वप्नील चव्हाण यांनी पाठपुरावा केला.

सकाळच्या वेळेत शालेय विद्यार्थ्यांसाठी सुपेगांव ते मुरुड एसटी सेवा सुरू करण्यात यावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे तालुका उपाध्यक्ष स्वप्नील चव्हाण, महेश मानकर, पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी मुरुड आगारप्रमुख वाकचौरे यांना एका निवेदनाद्वारे केली होती.

मुरुड तालुक्यातील फणसाड अभयारण्यालगत असलेल्या सुपेगाव या गावातील विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन शिक्षणासाठी सर एस.ए. हायस्कूल मुरुड येथे सकाळच्या सत्रासाठी प्रवेश घेतला आहे. वरील विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने त्यांना खासगी वाहनाने प्रवास करणे शक्य होत नाही, त्यामुळे या मुलांना पहाटे सुपेगाव ते उसरोली फाट्यापर्यंत चालत जावे लागते. सुपेगाव हे वन्यजीव अभयारण्यालगत असल्याने चालत जाणे हे येथील मुलांच्या दृष्टीने धोकादायक ठरु शकते. आपण मुरुड सुपेगाव बस पुन्हा सुरु करून विद्यार्थ्यांना होणारी पायपीट थांबवावी, अशी मागणी केली होती.

मुरुड आगार प्रमुख वाकचौरे यांनी निवेदनाची दखल घेऊन सकाळच्या वेळेत सुपेगांव एसटी सेवा सुरू केली आहे.

Exit mobile version