कोस्टल कोकण संस्थेतर्फे मुरुड तालुका सुपारी संघ सन्मानित

। मुरूड । वार्ताहर ।
कोस्टल कोकण, मुंबई या संस्थेकडून दादर येथील स्वातंत्रवीर सावरकर सभागृहात कोस्टल कोकण या मासिकाचे नुकतेच प्रकाशन करण्यात आले. सदर कार्यक्रमात कोकणाच्या प्रगतीसाठी सातत्याने चांगले काम करणार्‍या संस्था तसेच व्यक्तींचा सन्मान करण्यात आला. त्यावेळी सहकारी संस्थांमध्ये अत्यंत चांगले काम करणार्‍या मुरुड तालुका सहकारी सुपारी संघ यांचा समावेश करुन सन्मान करण्यात आला.
सदर कार्यक्रमात व्यासपीठावर आ.नितेश राणे, सिने अभिनेते संदीप कुलकर्णी, अशोक दुभाडे, अनंत भालेराव आणि कार्यक्रमाचे आयोजक प्रदीप मांजरेकर व रचना लचके बागवे, अमित बागवे उपस्थित होते. या वर्षी मुरुड तालुका सुपारी संघाने जो विक्रमी भाव दिला त्याबद्दल आ.नितेश राणे यांनी मुरुड सुपारी संघाचे कौतुक केले. पुरस्कार स्वीकारण्यासाठी मुरुड तालुका सुपारी संघाचे चेअरमन महेश भगत, नियंत्रण मंडळ अध्यक्ष संजय गुंजाळ, संचालक जगदीश पाटील, प्रमोद मसाल, नाना गुरव, राजेंद्र भायदे उपस्थित होते.

Exit mobile version