मुरुडकरांचा प्रवास भंगार बसेसमधून?

एमएसआरटीसी करतेय प्रवाशांच्या जीवाशी खेळ; माहितीच्या अधिकारात माहिती उघड

| कोर्लई | वार्ताहर |

भंगार झालेल्या बसेसमधून मुरुडकरांचा प्रवास सुरू असून, एमएसआरटीसीकडून प्रवाशांच्या जीवाशी खेळ करीत आहे. मुरुड आगारातील सर्वच बसेस दहा वर्षांच्या वरील असल्याचा धक्कादायक प्रकार माहिती अधिकारात उघड झाला आहे, अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते समीर रांजणकर यांनी दिली.

मुरुड आगारात सद्यःस्थितीत 33 बसेस कार्यरत आहेत. या बसेसचे आयुष्यमान संपत आलेले आहे. सर्व बसेस दहा वर्षांवरील, तर काही बसेस 14 वर्षांपर्यंतच्या आहेत. या बसेसना मुंबईमध्ये प्रवासास बंदी असूनदेखील मुरुड आगारातून त्या मुंबईसाठी सोडल्या जातात. या बसेस वारंवार ठिकठिकाणी रस्त्यामध्ये बंद पडत असतात, काही वेळा शहरातच बंद पडतात, तरी काही बसेसना आगसुद्धा लागलेली आहे. अशा या भंगारात निघालेल्या बसेस मुरुड-मुंबई प्रवासासाठी सोडल्या जातात. सदर परिस्थितीचे गांभीर्य ओळखून वारंवार समीर रांजणकर यांनी मुरुड आगाराशी संपर्क साधला. तिथेच न थांबताना पेण विभाग नियंत्रक यांच्याशी संपर्क साधला आणि मुरुडसाठी नवीन बसेसची मागणीसुद्धा केली होती. दहा-बारा बसेस मुरुडसाठी नवीन येणारसुद्धा होत्या. दरम्यान, तीन नवीन बसेस मिळाल्या होत्या, परंतु त्यातील दोन बसेस अचानक अलिबाग आगाराला देण्यात आल्या, त्यामुळे मुरुडसाठी फक्त एकच नवीन बस उपलब्ध आहे.

मुंबईमध्ये जाण्यासाठी किती वर्षांच्या बसेसना परवानगी आहे, या संदर्भात माहिती अधिकारात माहिती मागविली असताना रायगड विभाग नियंत्रक पेण यांनी माहिती दिली की, मुंबईमध्ये आठ वर्षांच्या आतील बसेसना परवानगी आहे. तरीसुद्धा मुरुड आगारातील दहा वर्षांवरील बसेस रोजचा मुरुड-मुंबई प्रवास करीत आहेत. दोन तर बसेस 14 वर्षे पूर्ण झालेल्या आहेत. या बसेस मुरुड-बोरवली, मुरूड-मुंबई प्रवासासाठी वापरल्या जातात. या बसेसमधून मुरुडचे प्रवासी जीव मुठीत घेऊन रोजच प्रवास करत आहेत. मुरुड आगाराची परिस्थिती खूप चिंताजनक आहे.

Exit mobile version