मुरुडचं शिवार भरलं सोन्यानं

तालुक्यातील भातशेती कापणीसाठी तयार

| मुरूड-जंजिरा | वार्ताहर |

मुरूड तालुक्याच्या विविध भागात भातशेती कापणीसाठी तयार झाली आहे. भाताचे शिवार सोन्यासारखे पिवळेधम्मक दिसत असल्याचा भास होत आहे. कापणीच्या कामासाठी सध्या मजूर उपलब्ध असले तरी सर्व ठिकाणी कापणी सुरु झाली की मजूर मिळणे अवघड होते. येथे पुरुष मजुरीचा दिवसाचा दर रु 400/- तर महिला मजुरीचा दर 250/- इतका आहे.

मुरूड तालुक्यात भातशेती हे मुख्य पीक असून, सुमारे 3 हजार हेक्टरवर भातशेती करण्यात आली आहे. मुरूड तालुक्यातील खारआंबोली पंचक्रोशीतील माऊली वारकरी संप्रदायाचे प्रमुख विकास कमाने यांनी सांगितले की, भातपीक पूर्णपणे तयार झाले असून, दसऱ्यानंतर भातकापणीला वेग आला आहे. त्यामुळे भात लावणीनंतर घरी बसून असलेल्या मजूर वर्गाच्या हाताला काम मिळणार आहे. मधल्या काळात पावसाने शेतीला जलमय केले होते. तरीही अनेक ठिकाणी भातशेती बचावली असल्याने पीक तरारून आले आहे. त्यामुळे तयार भातशेती जलद कापून घेण्यासाठी शेतकरी प्राधान्य देताना दिसून येत आहेत.अकस्मात पावसाचा भरवसा नसल्याने दिवाळी पूर्वीच भात शेती कापून घेऊन झोडण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढता आहे. भात शेती कापून किमान भात रोपे रचून ठेवली तरी 60 टक्के काम पूर्ण होत असते. अचानक पाऊस आलाच तर मळणीवर ताडपत्री टाकुन पिकाचे रक्षण करता येते. जया, रुपाली, कर्जत, सोनम, सुवर्णा, कोलम, रत्ना अशा विविध प्रकारातील भात शेती करण्यात आलेली आहे. मुरूड तालुक्यात भात कापणीची मोठी लगबग सोमवार पासून सुरू होईल अशी माहिती रघुमाथ माळी आणि तुकाराम पाटील आणि शेतकऱ्यांनी दिली.

शेतीकामासाठी पलटेल पद्धती
हल्ली भातशेती कामासाठी सर्वांनाच मजुरी देणे परवडत नाही. यासाठी गावांतून एक मेका साहाय्य करू 'अवघे धरू सुपंथ' याप्रमाणे ग्रामस्थ एकमेकांकडे विनामूल्य पध्दतीने कामासाठी जातात. या पद्धतीला पलटेल पद्धत म्हणतात. खारआंबोली, वाणदे, शिघ्रे, नागशेत, जोसरांजन, वावडूंगी, सायगाव आदी गावांतून पटेली पद्धतीचा उपयोग आजही केला जातो, अशी माहिती तुकाराम पाटील, विकास कमाने, रघुनाथ माळी आदी शेतकऱ्यांनी दिली.पलटेल पद्धतीने भात शेतीची कामे वेळेत आटोपली की, नंतर मजुरी देऊन माणसे घेण्याशिवाय पर्याय नसतो.
भातशेतीवर खोडकिडीचा प्रादुर्भाव
मुरूड तालुक्यात भात शेती उत्तम तयार झाली असली तरी अनेक भागात भात पिकावर पिवळ्या खोड किडीचा प्रादुर्भाव झाल्याचे वाणदे गावचे शेतकरी तुकाराम पाटील यांनी सांगितले. ते म्हणाले की, आता भातपीक तयार झाले आहे. खोड किडा भाताच्या बुंध्याला लागला की भाताचा गर किंवा दाणा फस्त करतो. भाताच्या लोंब्या तयार होऊन वाकलेल्या कणसांमध्ये भाताचा भरीव दाणा असतो. सरळ वाढलेल्या रोपांमध्ये पोंजीपणा आलेला असतो. त्यावेळी खोड कीड लागली असे समजावे. खोड कीड लागली की भाताचा उतारा कमी मिळतो.
Exit mobile version