मुरुडची दैनावस्था: दरड कोसळल्याने खोरा बंदरहून जेटीकडे जाणारा मार्गही बंद

मुरूड जंजिरा | प्रकाश सद्रे |

माती आणि दरड खाली आल्याने मुरूड जवळील खोरा बंदर जेटी कडे जाणारा मार्ग पूर्णपणे बंद झाला आहे. मंगळवारी ही घटना घडली असून बुधवारी देखील या दरडी जेसिबी आणून दूर केलेल्या नाहीत असे दुपारी दिसून आले.                 

खोरा बंदर जेटीकडे जाणारा मार्ग डोंगराच्या बाजूने कटिंग करीत पूर्वीच निर्माण करण्यात आलेला आहे.हे बंदर महाराष्ट्र शासनाचे अधिकृत बंदर आहे.सध्या पावसाळी सिझन मुळे येथून जंजिरा किल्यात  पर्यटकांना घेऊन जाणारी लॉन्च प्रवाशी सेवा बंद आहे. येथे सायंकाळी फिरण्यासाठी सातत्याने नागरिक येत असतात. माती आणि दरड पूर्ण रस्त्यावर आल्याने चार चाकी, दुचाकी किंवा सायकल देखील जेटी पर्यन्त जाऊ शकत नाही. अद्याप ही दरड दूर करण्यासाठी कोणतीही यंत्रणा आलेली नाही.मुसळधार पावसाने अजूनही माती खाली येऊ शकते.एका बाजूला कातळ असणारा डोंगर आणि दुसऱ्या बाजूला समुद्राला हटवून केलेला रस्ता अशी या मार्गाची रचना आहे. पावसाळ्यात येथे हमखास दरड कोसळण्याची शक्यता असते.या वर मेरिटाईम बोर्ड अथवा सार्वजनिक बांधकाम खात्याने आजिबात लक्ष दिलेले  नाही.बुधवारी दुपारी 1 वाजता या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता  कोसळलेली दरड जैसे थे आहे.मुसळधार पाऊस पडत असल्याने दरडी पडण्याचे सत्र सुरूच आहे.पावसाने मुरुडला वेढलेले  आहे.मुरुडकडे फक्त  रोहा सुपेगाव मार्गे येणारा मार्ग सुरू असला तरी विहूर गावा नजीक रस्ता वाहून गेल्याने एस टी बस वाहतूक बुधवारी देखील सुरू करण्यात आली नसल्याचे मुरूड बस आगार प्रमूख श्री सुनील वाकचौरे यांनी सांगितले.     

Exit mobile version