आंतरराष्ट्रीय फोटोग्राफी स्पर्धेत मुरुडची बाजी

छायाचित्रकार नितीन शेडगे यांना सुवर्णपदक
कोर्लई | वार्ताहर |
मुरुड जंजिरा येथील छायाचित्रकार नितीन शेडगे यांना दिल्ली येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय फोटोग्राफी स्पर्धेत सुवर्णपदक पटकावून जागतिक स्तरावर मुरुडच्या नावलौकिकात भर घातला आहे. या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे.
दिल्ली येथील जेसीएम फोटोग्राफिक सोसायटीने आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय फोटोग्राफी स्पर्धा-2021 यामध्ये अमेरिका, ऑस्ट्रेलियासारख्या विविध देशांतील 344 छायाचित्रकारांनी भाग घेतला होता. फोटोग्राफिक सोसायटी ऑफ अमेरिका, इंडियन इंटरनॅशनल फोटोग्राफिक कौन्सिल, फोटोग्राफिक फेडरेशन ऑफ इंडिया व वाईल्डलाइफ फोटोग्राफी असोसिएशन ऑफ इंडिया या नामांकित संस्थेच्या मान्यतेने आयोजित केलेल्या स्पर्धेत मोनोक्रोम फोटोग्राफी, कलर फोटोग्राफी, नेचर फोटोग्राफी व फोटो ट्रॅव्हल हे विषय ठेवण्यात आले होते. सर्व विषयांवर सुमारे 3500 फोटोंवर ही स्पर्धा ऑनलाईन पद्धतीने पार पडली.
या स्पर्धेत मुरुडचे छायाचित्रकार नितीन शेडगे यांना ‘फोटो ट्रॅव्हल’ विषयात ‘बेस्ट ऑफ फेस्टिव्हल’ या फोटोला सुवर्णपदक मिळाले असून, इतर विषयात चार फोटोंना एक्सेपटन्स मिळाले असून, या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे.

Exit mobile version