| मुरुड-जंजिरा | प्रतिनिधी |
हैदराबाद फोटो ट्रेंड व सिग्मा अकॅडमी ऑफ फोटोग्राफी तर्फे वेडिंग छायाचित्र स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत मुरूडचे सौरभ नाझरे यांना वेडिंग विभागात राज्यातून प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाल्याचे नुकतेच जाहिर करण्यात आले आहे. या स्पर्धेत हजारो छायाचित्रकार सहभागी झाले होते. त्यातून सौरभ यांचा लग्नातील विशेष फोटो निवडण्यात आला. त्यांना 10 हजार रुपयांचे रोख पारितोषिक, सन्मानपात्र व चषक देण्यात येणार आहे. तसेच, त्यांना प्रिवेडिंग विभागात देखील एका फोटोला पुरस्कार मिळाला आहे. या स्पर्धेचे परीक्षण जागतिक पातळीचे परीक्षक नामवंत छायाचित्रकार एम. सि. शेखर, जिनेश प्रसाद, अनुराग बडोळिया व चंदन सुंदर यांच्यासह भारतातील विविध भागातून आलेल्या परीक्षकांनी केले. मुरूड तालुक्यातील सौरभ नाझरे हे गेली 15 वर्षे व्यवसाईक फोटोग्राफी करत आहेत. त्यांनी निसर्गचित्रांसोबत लग्न समारंभात विशेष फोटोग्राफीत प्राविण्य मिळवल्याने नाविन्यपूर्ण फोटो शूट कार्यसाठी प्रसिद्ध आहेत. रायगड फोटोग्राफी असोसिएशनच्या 2023 फोटो स्पर्धेत देखील त्यांनी प्रथम क्रमांक मिळवला होता. सौरभ यांचे वडील सुधीर नाझरे यांचा पारंपरिक छायाचित्रणाचा व्यवसाय असल्याने वडिलांचे मार्गदर्शन घेऊन फोटोग्राफी क्षेत्रात उंच भरारी घेतली आहे.






