माझा कचरा माझी जबाबदारी

हि भावना विद्यार्थीवर्ग आणि शहरांतील महीला वर्गावर रुजविण्यात म्हसळा नगरपंचायत यशस्वी

| म्हसळा | वार्ताहर |

स्वच्छ सर्वेक्षण 2023 ची प्रभावीपणे अंमलबजावणी म्हसळा शहरात सुरु असताना माझा कचरा माझी जबाबदारी ही भावना विद्यार्थी आणि सर्व जनतेच्या मनात रुजविण्यासाठी पथनाट्यांमधून स्वच्छ सर्वेक्षणसाठीची जनजागृती करण्यात आली.

म्हसळा शहरातील कन्या शाळा अंजुमन शाळा, न्यू इंग्लिश शाळा येथे मुलांना प्लास्टिक बंदीवर आधारित चित्रपट/पी.पी. प्रेझेंटेशनने माहिती देऊन त्यांना नाविन्य पूर्ण उपक्रम करण्यास प्रोत्साहित करण्यात आले. सर्वप्रथमच होम मिनिस्टर हा कार्यक्रम म्हसळा नगरपंचायतीतर्फे आयोजित करण्यात आला. म्हसळा शहराची पहिली स्वच्छ मिनिस्टर बनण्याचा मान पल्लवी निमेश म्हशिलकर हिला मिळाला. शहरातील 80 महिलांनी उस्फुर्तपणे सहभाग घेऊन सर्व स्वच्छतेत निगडीत मनोरंजक उपक्रम घेण्यात आले.

‘उखाणा स्वच्छतेचा’ या उपक्रमात महिला वर्गाने उत्साहाने सहभाग घेतला. शालिनी धावट यांनी नंबर पटकाविला. त्यासोबतच गुलाब जैन, अनामिका राठोड आणि किरण जैन या महिला अंतिम फेरीत प्रवेश करून उपविजेता ठरल्या. यादरम्यान लकी ड्रॉ पैठणी जिंकण्याची आगळी वेगळी संधी नगरपंचायतीकडून ठेवण्यात आली होती. ज्यात वैशाली करंबेचा नंबर आला. यासोबतच बाकी महिलांनादेखील विशेष बक्षिसे जिंकण्याची संधी मिळाली.

स्वच्छतेची सुरुवात ही म्हसळामधील प्रत्येक महिलेच्या घरापासून सुरु व्हावी आणि किचन वेस्टचे रुपांतर कंपोस्ट खतामध्ये करण्यासाठी त्याचे प्रशिक्षण देण्यात आले. आपल्या शहरातील घनकचरा व्यवस्थापनाचे काम कसे चालू आहे, याबाबतची माहिती महिलांना प्रश्‍नावलीमधून देण्यात आली. शहरातील कुंभार आळी, धावीर मंदिर परिसर, बौद्धवाडी, एस.टी. स्टँड येथे ही पथनाट्ये करण्यात आली. या कार्यक्रमाच्या बक्षीस वितरण सोहळ्यास नगराध्यक्ष असहल कादिरी, उपनगराध्यक्ष सुनील शेडगे, मुख्याधिकारी मनोज उकिर्डे, सरोज म्हशिलकर, सुमैय्या आमदानी, नगरसेवक अनिकेत पानसरे, नगरसेविका राखी करंबे, कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी दिपाली मुंडये, लेखापरीक्षक आरती केंडे, स्थापत्य अभियंता ज्योती करडे, पथनाट्य सादरकर्ते माय नॉलेज फाऊंडेशनचे प्रसाद मेंदेडकर, मान्यवर आणि नगरपंचायतीच्या विविध विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

नगरपंचायतीच्या कर्मचारी शहर समन्वयक प्रियांका चव्हाण या स्वच्छ सर्वेक्षण 2023 ची प्रभावीपणे अंमलबजावणी करत असून, त्यांचा स्थानिक लोकप्रतिनिधी, शहरांतील आरोग्य संस्था, विविध शिक्षण संस्था, पत्रकार संघटना, बचत गट, सामाजिक संस्था यांचे जवळ योग्य समन्वय आसल्याने कार्यक्रम यशस्वी झाला.

अनिकेत पानसरे
नगरसेवक, नगरपंचायत म्हसळा
Exit mobile version