| पेझारी | वार्ताहर |
‘एक शिक्षक आपल्याला मिळालेल्या मानवी आयुष्याचा कसा सदुपयोग करू शकतो याचे उत्तम उदाहरण म्हणजेच प्रा. एन.डी. पाटील!’ शिक्षकांनी त्यांच्या कार्यातून प्रेरणा घ्यावी. कारण, भावी पिढी घडविण्याचे कार्य शिक्षक करत असतात. महाराष्ट्राच्या इतिहासात प्रा. एन. डी. पाटील यांचे नाव, कार्य कायम अग्रक्रमी असणार आहे. त्यांच्या रूपाने एक कणखर नेतृत्व शे.का. पक्षाला लाभले, त्यामुळेच शे.का. पक्ष महाराष्ट्राच्या राजकारणात नेहमीच ताठ मानेने वावरत राहिला आहे. अशा शब्दात प्रा. एन.डी. पाटील यांच्याविषयी पंडित पाटील यांनी गौरवोद्गार काढले. ते एन.डी. पाटील यांच्या निधनानिमित्त आयोजित शोकसभेतील अध्यक्षीय भाषणात बोलत होते.
शेतकरी कामगार पक्षाचे माजी सरचिटणीस, माजी सहकारमंत्री प्राध्यापक एन.डी. पाटील यांचे सोमवार, दि. 17 जानेवारी रोजी निधन झाले. त्यांना आदरांजली वाहण्यासाठी आंबेपूर येथील ना.ना. पाटील संकुलाच्या ‘सुलभाकाकू’ सभागृहामध्ये शोकसभा आयोजित करण्यात आली होती.
या सभेमध्ये सुरुवातीला संगीत शिक्षक राजेंद्र म्हात्रे यांनी निधनाबद्दल काव्यमय शब्दसुमनांजली अर्पण केली. पुढे सायली पाटील यांनी प्रास्ताविक केले. शोकसभेचे औचित्य साधून एन.डी. पाटील यांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा संकुलप्रमुख डी.पी. कुलकर्णी, श्री. सोनावणे, श्री. बिर्हाडे, श्री. बर्गे, प्रकाश म्हात्रे, पांडुरंग पाटील, अनिल पाटील यांनी आपल्या भाषणातून घेऊन आदरांजली वाहिली. यावेळी पं.स. उपसभापती अनिल पाटील, शाळा समिती सदस्य यशवंत पाटील, एस.के. पाटील, सत्रप्रमुख विकास पाटील, तृप्ती पिळवणकर, संकुलातील सर्व शाखांचे प्रमुख, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने घालून दिलेल्या अटी व नियमांचे पालन करत सदर शोकसभा संपन्न झाली.