विधिमंडळावर लाँगमार्च; सरकारला विचारणार जाब
| पनवेल | प्रतिनिधी |
नैना प्रकल्पग्रस्त पुन्हा एकवटले असून,हा प्रकल्प रद्द करण्याचे आश्वासन देऊनही त्याचा विसर पडलेल्या राज्यकर्त्यांना जाब विचारण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी केला आहे. यासाठीच आम्ही गुरुवारी (दि.3) विधिमंडळावर लाँगमार्च काढून सरकारला जाब विचारणार आहोत, असे माजी आ.बाळाराम पाटील यांनी शनिवारी पनवेल येथे जाहीर केले.
शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारा नैना प्रकल्प हा बिल्डर्स धार्जिणा आहे. स्वतःची तसूभर जमीन नसताना देखील सिडको प्रशासनाची ही एजन्सी शेतकऱ्यांच्या जमिनीपैकी 60 टक्के जमिनीवर कब्जा करणार आहे. इतकेच नव्हे तर यापूर्वी ग्रामपंचायतीकडून रीतसर परवानगी घेतलेली घरे देखील अनियमित ठरवत नैना प्राधिकरणाने अक्षरशः जुलूम सुरू केलेला आहे.
बाळाराम पाटील, माजी आमदार
शेतकऱ्यांच्या भावना अधिवेशनापर्यंत पोहोचविण्यासाठी महाविकास आघाडी आणि नैना प्रकल्प बाधित शेतकरी उत्कर्ष समितीने पनवेल ते विधिमंडळ अशा पायी लॉन्ग मोर्चाचे नियोजन केले आहे. येत्या 3 ऑगस्ट रोजी निघणाऱ्या मोर्चा बाबतची माहिती देण्यासाठी पनवेलच्या शेकाप कार्यालयामध्ये शनिवारी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
बाळाराम पाटील म्हणाले की, लाँग मार्चच्या माध्यमातून सरकारपर्यंत आम्ही शेतकऱ्यांच्या भावना पोहोचविणार आहोत. शेतकऱ्यांचा पराकोटीचा विरोध होत असताना देखील नैना या एजन्सीने भूखंड वाटपाबाबत बिल्डर मंडळी सोबत साटे लोटे करून शेतकऱ्यांना उध्वस्त करण्याच्या हेतूने कार्यक्रम आरंभीला होता. आम्ही तो प्रयत्न हाणून पाडला, वेळप्रसंगी पोलीस अटकेला देखील सामोरे गेलो. हा प्रकल्प नको अशा धाटणीची भूमिका लोकशाहीच्या मार्गाने आम्ही वेळोवेळी मांडत असल्याचे त्यांनी नमूद केले.
असा असेल लाँगमार्च
3 ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजता छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून लाँग मार्च सुरू केला जाईल. 3 तारखेला दुपारचे भोजन आणि विश्रांती याकरता सानपाडा येथील दत्त मंदिरामध्ये लाँगमार्च थांबेल. तर, चेंबूर येथे पहिल्या दिवशी मोर्चाची वस्ती असेल. दि.4 सकाळी लवकर उठून आम्ही विधिमंडळाच्या दिशेने मार्गक्रमण सुरू करणार आहोत, असे पाटील यांनी जाहीर केले.
शेकाप पनवेल तालुका चिटणीस राजेश केणी यांनी प्रास्ताविकातून नैना प्रकल्प बाधित शेतकरी उत्कर्ष समितीची भूमिका विषद केली. बबन दादा पाटील आणि प्रशांत पाटील यांनी नैना प्रकल्पाबाबत नगरविकास खात्याच्या भूमिकेबद्दल सवाल उपस्थित करत शेतकऱ्यांना मारक ठरणारे प्रकल्प हद्दपार केले पाहिजे, अशी भूमिका मांडली. पत्रकार परिषदेच्या अंती सुदाम पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले.
शेकाप नेते जे एम म्हात्रे, शिवसेनेचे सल्लागार बबनदादा पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस प्रशांत पाटील, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सदस्य भाई आर.सी. घरत, पनवेल शहर जिल्हा अध्यक्ष सुदाम गोकुळशेठ पाटील, शेकाप पनवेल शहर जिल्हा चिटणीस गणेश कडू, तालुका चिटणीस राजेश घरत, शिवसेना जिल्हा अध्यक्ष शिरीष घरत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा कराडी समाजाचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष सूरदास गोवारी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नारायणशेठ घरत, नैना प्रकल्प बाधित शेतकरी उत्कर्ष समितीचे अध्यक्ष वामन शेळके, बाळाराम फडके, काँग्रेस पक्षाचे पनवेल तालुका अध्यक्ष नंदराज मुंगाजी, नगरसेवक रवी भगत, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक भाई सुभाष पाटील, रामदास पाटील, विश्वास पेटकर आदी मान्यवरांच्या सह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी पत्रकार परिषदेला उपस्थित महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या बद्दल अत्यंत खालच्या पातळीची टीका करणारे संभाजी भिडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा जाहीर निषेध केला. यावेळी संभाजी भिडे यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले.