कारवाईसाठी आलेले नैनाचे पथक फिरले माघारी
| नवीन पनवेल | प्रतिनिधी |
विहिघर एका बांधकामावर कारवाई करण्यासाठी नैनाचे पथक गुरुवारी (दि. 24) आले होते. यावेळी ग्रामस्थांनी केलेल्या विरोधामुळे नैनाच्या पथकाला माघारी फिरावे लागले. ग्रामस्थांच्या एकजुटीचा हा विजय आहे.
तेवीस गावांमध्ये होत असलेल्या नैनाला ग्रामस्थांचा कडाडून विरोध कायम आहे. शेतकर्यांना 60-40 चा फॉर्म्युला मान्य नाही. याविरोधात शेतकर्यांनी अनेक मोर्चे, आंदोलने, निषेध, मूक मोर्चा काढलेले आहेत. नैनामुळे येथील शेतकरी उद्ध्वस्त होणार असल्याचे बोलले जात आहे. नैना प्रश्न विधिमंडळातदेखील उपस्थित झाला आहे. मात्र तरीदेखील नैनाने गावांमध्ये कारवाई सुरू ठेवलेली आहे. या विरोधात एकूण आठ ते नऊ याचिका दाखल करण्यात आले आहेत. ग्रुप ग्रामपंचायत चिपळे हद्दीतील पाच गावांनीदेखील नैनाविरोधात याचिका दाखल केली आहे. गुरुवार, 24 एप्रिल रोजी नैनाचे पथक पोलीस बंदोबस्तासह येथील एका बांधकामावर तोडक कारवाई करण्यासाठी आले होते. याची माहिती ग्रामस्थांना मिळताच ग्रामस्थांनी एकजूट दाखवत या कारवाईला जाहीर विरोध केला. यावेळी नैना विरोधात याचिका दाखल करण्यात आली असल्याचे त्यांना सांगण्यात आले. ग्रामस्थांनी दाखवलेल्या एकजुटीपुढे नैनाला माघार घ्यावी लागली. यापुढे देखील गावांमध्ये नैना अशा प्रकारे कारवाई करण्यासाठी येत असेल तर ग्रामस्थांनी एकजूट दाखवावी आणि नैनाला हद्दपार करावे, असे आवाहन करण्यात आले.







