रायगड जिल्हा परिषदेचा उपक्रम, ग्रामीण भागात रोजगार मिळणार
| रायगड | वार्ताहर |
जल जीवन मिशन अंतर्गत राज्यातील पाणी पुरवठा योजनेची देखभाल व दुरुस्ती होणे अत्यंत आवश्यक असल्याने जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये गवंडी, प्लंबर, मेकॅनिक, फिटर व इलेक्ट्रिशियन, पंप ऑपरेटर याप्रमाणे तीन नल-जल मित्र यांची नेमणूक करण्यात येणार आहे. यासाठी इच्छुकांनी आपापल्या ग्रामपंचायतशी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांनी केले आहे.
याबाबत जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजनेची देखभाल दुरुस्ती योग्य रीतीने व्हावी. या उद्देशाने प्रति ग्रामपंचायत 3 नलजलमित्र यांची निवड करण्यात येणार आहे. तिन्ही पदांकरीता प्रत्येक पदासाठी तीन याप्रमाणे प्रति ग्रामपंचायत 9 उमेदवारांची नामनिर्देशने राज्यस्तरावर करण्यासाठी ग्रामपंचायतने त्यांची माहिती घेऊन अॅपवर भरायची आहे. ग्रामपंचायतीने सादर केलेल्या नामनिर्देशनामधून राज्यस्तरावरून उमेदवारांची निवड करून त्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
प्लंबर-गवंडी, मोटर मेकनिक-फिटर आणि इलेक्ट्रिशियन-पंप ऑपरेटर या तीन ट्रेडसाठी गावातील अनुभव असलेल्या व उचित पात्रता धारण करणार्या उमेदवारास प्राधान्य देण्यात येणार आहे. म्हणजेच हे कौशल्य असलेल्या उमेदवारास गावातच रोजगार उपलब्ध होणार आहे. यामधून प्रति ग्रामपंचायत कौशल्य संचसाठी एक ट्रेडसाठी एक उमेदवार प्रमाणे अंतिम 9 पैकी 3 उमेदवार निवड करण्यात येणार आहेत. तसेच इच्छुकांनी आपले नावे ग्रामपंचायतीस देऊन सहकार्य करावे, असे आवाहन प्रकल्प संचालक जल जीवन मिशन शुभांगी नाखले यांनी केले आहे.