लोकसभेच्या रणांगणात नणंद-भावजयची लढत

| पुणे | वृत्तसंस्था |

राज्यात गेल्या पाच दशकांपासून ज्या नावाभोवती राजकारणाचा, समाजकारणाचा, आरोप प्रत्यरोपांचा आणि अनके कपोलकल्पितांचा केंद्रबिंदू ठरला आहे अशा पवार कुटुंबियांमध्ये अभूतपूर्व अशी फूट पडली आहे. अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची दोन तुकडे करून भाजपच्या मांडीला मांडी लावून बसल्यानंतर पहिल्यांदाच पवार कुटुंब निवडणुकीला सामोरे जात आहे. त्यामध्ये आता थेट बारामतीमध्ये सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे अशी लढत म्हणण्यापेक्षा अजित पवार विरुद्ध शरद पवार अशी बारामतीसह पुणे जिल्ह्यातील तसेच राज्यातील राजकीय अस्तित्वाची असेल. या लढाईत बारामतीची काका की पुतण्याची याचा सुद्धा फैसला होणार आहे.

राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून सुप्रिया सुळे यांना उमेदवारी औपचारिकपणे जाहीर करण्यात आली आहे, तर अजित पवार गटाकडून त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना रिंगणात उतरवलं आहे. त्यामुळे ज्या पवार कुटुंबाने गेल्या साडेपाच दशकांपासून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आपलं दबदबा ठेवला, कौटुंबिक नाती किती महत्त्वाची आहे हे प्राधान्याने दाखवून देण्याचा प्रयत्न केला, राजकारण घरापर्यंत कधी येऊ दिले नाही ते आज कुटुंबच पूर्णतः राजकारणामध्ये विभागलं गेलं आहे. अजित पवार यांनी बंडाळी केल्यानंर राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवार यांच्या वाट्याला गेलं आहे. त्यामुळे बारामतीतील लढाई ही पहिल्यांदाच या सर्व घडामोडीनंतर असणार आहे.

पक्ष फुटल्यानंतर कुटुंबातही फूट
बारामतीमध्ये सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे अशी लढत होत असली तरी ही लढत निश्‍चितच या दोघींमधील नसेल. अजित पवार आणि शरद पवार यांच्यामधील या नेत्यांमध्ये असणार आहे. बारामतीवर वर्चस्व कुणाचा असणार याचे उत्तर देणारी ही निवडणूक असणार आहे, गेल्या काही दिवसांपासून बारामतीची जागा सातत्याने चर्चेत होती. जेव्हा सुनेत्रा पवारांच्या उमेदवारीचा विषय चर्चेत आला तेव्हा बारामतीमध्ये ठिणग्या पडण्यास सुरुवात झाली. पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला मिळाल्यानंतर अजित पवार यांनी सातत्याने शरद पवार आणि सुप्रिया सुळेंवर टीका केली होती. या टीकेचे पडसाद पवार कुटुंबामध्ये सुद्धा उमटले आहेत. अजित पवारांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार, पुतणे युगेंद्र पवार, विरोधात गेले आहेत. पवार कुटुंबामध्ये सुद्धा पक्षांतर्गत झालेल्या घडामोडीवरून परिणाम झाल्याचे दिसून आलं आहे. बारामतीमधून निवडणूक लढवण्याचे निश्‍चित केल्यानंतर अजित पवार यांनी सातत्याने शरद पवार बारामतीमध्ये भावनिक करतील वगैरे असे आरोप करत वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यानंतर ते स्वतःच भावनिक वातावरण करताना दिसून आले. मला कुटुंबामध्ये एकटं टाकलं गेला आहे, तुम्ही मला एकटं टाकू नका, अशा पद्धतीने प्रचार करताना दिसून आले. त्यामुळे या निवडणुकीला भावनिक किनार सुद्धा असणार आहे.
अजित पवारांचा सख्खा भाऊ विरोधात
अजित पवार यांनी बारामतीमध्ये शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यावर टीका सुरू केल्यानंतर त्याचे पडसाद पवार कुटुंबियांमध्ये उमटले. अजित पवार यांची सख्खे बंधू श्रीनिवास पवार यांचे चिरंजीव युगेंद्र पवार हे पहिल्यांदा अजित पवारांविरोधात बोलताना थेटपणे दिसून आले. आमदार रोहित पवार सुप्रिया सुळे आणि शरद पवारांच्या मागे खंबीरपणे उभे राहिले आहेत. युगेंद्र यांनी राजकीय भूमिका घेतल्यानंतर त्यांचे वडील श्रीनिवास पवार यांनी सुद्धा काटेवाडीमध्ये गेल्यानंतर अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली होती. शेत कसायला दिले म्हणून शेतीचे मालक होत नाही अशा शब्दात त्यांनी अजित पवारांवर तोफ डागली होती.
Exit mobile version