। पनवेल । वार्ताहर ।
दर वर्षी पावसाळ्यात पर्यटकांचा ओढा धबधबे, धरण, आणि नद्यांकडे वळत असतो. मात्र अतिउत्साही पर्यटकांमुळे अपघात होण्याचे प्रमाण वाढत असल्याने तालुक्यातील निसर्गरम्य ठिकाणी जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. आपल्या पर्यटनाची हाऊस फिटवण्यासाठी तालुक्यातील पर्यटक आता पळस्पे फाटा ते कळंबोली डी पॉईंट दरम्यान असलेल्या डोंगर रांगानमधून वाहणार्या झर्यांना पसंती देत आहेत.
विशेषतः शनिवारी आणि रविवारी या ठिकाणी मोठी गर्दी होत असल्याचे पाहायला मिळत आहे. तालुक्यातील गाडेश्वर धरण परिसर, गाढी नदीपात्र,माची प्रबळगड तसेच खारघरमधील पांडवकडा परिसरात वाहणार्या धबधब्यांवर आणि पाण्याच्या ठिकाणी पावसाळी पर्यटनासाठी येणार्या पर्यटकांची दर वर्षी मोठी गर्दी असते. त्यामुळे पनवेल पालिका हद्दीत येणार्या पांडवकडा परिसराला पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्याची योजना प्रशासनाकडून अखण्यात आली आहे. मात्र, ही योजना अद्याप कागदावरच आहे. अतिउत्साही पर्यटकांमुळे होणारे अपघात रोखण्यासाठी पांडवकडा परिसर तसेच गाडेश्वर धरण, माची प्रबळगड या ठिकाणी पर्यटन बंदी करण्यात आली आहे. बंदी नंतर देखील काही पर्यटक या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करत असल्याने आशा पर्यटकांना रोखण्यासाठी या ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी घरा बाहेर पडणार्या पर्यटकांचा हिरमोड होत आहे. यातूनच मग पळस्पे ते जेएनपीटी महामार्गांवर असलेल्या नांदगाव येथील टेकडीवर पर्यटकांचा ओढा वाढला आहे. व्यावसायिकांना मात्र, चांगेल दिवस आलेत.
धाब्यावर गर्दी
जेएनपीटी महमार्गांवर अनेक ठिकाणी खाद्यपदार्थ विक्रीसाठी धाबे थाटण्यात आले आहेत. या ठिकाणी शाकाहारी तसेच मांसाहारी खाद्यपदार्थ विक्रीसाठी उपलब्ध आहेत. पावसाळी पर्यटनासाठी बाहेर पडलेली अनेक कुटुंब या ठिकाणी खाद्यपदार्थांवर ताव मारताना दिसून येतात.