नरेंद्र मोदींची हवा संपली: संजय राऊत

| जळगाव | प्रतिनिधी |

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहा वर्षांपासून जनतेला भ्रमीत केल्याचे आता सर्वांना लक्षात आले असल्याने आता त्यांच्या सभांना प्रतिसाद मिळत नाही. मोदींची हवा पूर्णपणे संपली आहे. आता सत्तापरिवर्तन होणारच, असा विश्‍वास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला.

महाविकास आघाडीतर्फे जळगाव जिल्ह्यातील जळगाव व रावेर या मतदारसंघातील उमेदवारांचे बुधवारी अर्ज दाखल करताना ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, काँग्रेस आणि आघाडीतील इतर घटकपक्षांतर्फे शहरात जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले. तत्पूर्वी ठाकरे गटाचे नेते खासदार राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवादात भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केले.

राज्यात महाविकास आघाडी आणि देशात इंडिया आघाडीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. मोदी व भाजपच्या भूलथापांना आता जनता भुलणार नाही. राज्यात मोदींच्या सभेला प्रतिसाद मिळताना दिसत नसून, मोदींसह त्यांचा पक्ष किती खोटारडा आणि फसवा आहे, हे जनतेला समजून चुकले आहे, असे संजय राऊत यांनी सांगितले. राज्यासह देशभरातील वातावरण बदलताना दिसत आहे. राज्यात मोदींची सभा कधी सुरू होते आणि कधी संपते, मोदी परत कधी गेले, हे कोणालाच समजत नाही, असे राऊत यांनी नमूद केले.

Exit mobile version