नाशिकचा रत्नागिरीला पराभवाचा धक्का

| पुणे | प्रतिनिधी |

महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्यावतीने आयोजित महाराष्ट्र प्रीमियर लीग स्पर्धेत धनराज शिंदे (नाबाद 44) धावांच्या खेळीच्या जोरावर ईगल नाशिक टायटन्स संघाने रत्नागिरी जेट्स संघाचा 9 गडी राखून पराभव करत विजयी घौडदौड रोखली.

गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या आंतरराष्ट्रीय मैदानावर सुरु झालेल्या या स्पर्धेत रत्नागिरी जेट्स विरुद्ध ईगल नाशिक टायटन्स यांच्यातील सामना काल पावसामुळे रद्द करण्यात आला होता. आज दोन्ही संघात प्रत्येकी 5 षटकांचा सामना खेळविण्यात आला. गुणतालिकेत अव्वल स्थानी असलेल्या रत्नागिरी जेट्स संघाची विजयी मालिका ईगल नाशिक टायटन्स संघाने रोखत तिसरा विजय मिळवला. सामन्यात प्रथम फलंदाजी करताना रत्नागिरी जेट्स संघाने 5 षटकात 2 बाद 83 धावा केल्या. यात धीरज फटांगरे 23, निखिल नाईक नाबाद 24, प्रीतम पाटील 21 धावा काढून संघाच्या डावाला आकार दिला.

हे आव्हान ईगल नाशिक टायटन्स संघाने अवघ्या 4 षटकात 1 बाद 85 धावा करून पूर्ण केले. धनराज शिंदेने 13 चेंडूत नाबाद 44 धावांची तुफानी खेळी केली. त्यात त्याने 1 चौकार व 6 षटकारांची आतषबाजी केली. त्याला मंदार भंडारीने 13 चेंडूत 2 चौकार व 3 षटकारासह नाबाद 29 धावा काढून साथ दिली. या जोडीने दुसऱ्या विकेटसाठी 19 चेंडूत 80 धावांची आक्रमक भागीदारी करून संघाला विजय मिळवून दिला.

Exit mobile version