| पाताळगंगा | प्रतिनिधी |
खालापूर पंचायत समितीच्या बालविकास प्रकल्पांतर्गत नवव्या राष्ट्रीय पोषण माहची सांगता विविध उपक्रमांनी उत्साहात करण्यात आली. केंद्र व राज्य शासनाच्या महिला व बालविकास विभागाच्या वतीने दि. 9 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर या कालावधीत राबविण्यात आलेल्या या अभियानातून सकस आहार आणि कुपोषणमुक्त समाजाचा संदेश देण्यात आला. यंदाच्या पोषण माहची संकल्पना ‘हमारी अंगणवाडी, हमारी जिम्मेदारी’ अर्थात ‘आमची अंगणवाडी, आमची जबाबदारी’ अशी होती. अंगणवाडी केंद्रांचे सक्षमीकरण आणि लोकसहभाग वाढविण्यावर भर देण्यात आला.
अंगणवाडी सेविका व महिलांच्या सहभागातून तृणधान्ये आणि स्थानिक पौष्टिक पदार्थांपासून तयार केलेल्या प्रथिनयुक्त पाककृतींचे प्रदर्शन भरविण्यात आले. गरोदर माता, स्तनदा माता आणि किशोरवयीन मुलींसाठी समुपदेशन सत्रे घेऊन रक्तक्षय निर्मूलन व संतुलित आहाराचे महत्त्व पटवून देण्यात आले. यावेळी दोन महिलांचा ओटीभरण कार्यक्रमही घेण्यात आला. कुपोषणमुक्तीचा संदेश देण्यासाठी विविध गावांत पोषण रॅली काढण्यात आल्या. तसेच नागरिकांनी पोषण प्रतिज्ञा घेतली. योग्य आहारामुळे कुपोषण कमी करण्यासाठी कशी मदत होते, याबाबत महिलांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी खालापूर पंचायत समितीचे सभापती कृष्णा पारंगे, जि.प. सदस्या रेश्मा पाटील, उपसभापती भाई शिंदे, पंचायत समिती सदस्या अर्चना भोईर, गौरीताई गडगे, प्रमिला पाटील बालविकास प्रकल्प अधिकारी विशाल कोतगडे, प्रीतम घोसाळकर, आरती तेलकडे, मनिषा कांबळे तसेच मुख्य सेविका, आरोग्य विभागाचे कर्मचारी, स्थानिक आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि स्थानिक माता उपस्थित होत्या.







