पीएनपी महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिवस उत्साहात साजरा

| अलिबाग | प्रतिनिधी |

प्रभाकर पाटील एज्युकेशन सोसायटीच्या कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयामध्ये दिनांक 28 फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य रविंद्र पाटील उपस्थित होते. तसेच महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. ओमकार पोटे, कनिष्ठ महाविद्यालयाचे भूगोल विभागाचे प्रा. दिनेश पाटील, कला आणि मराठी विभाग प्रमुख डॉ. नम्रता पाटील आणि वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. रसिका म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक विज्ञान विभाग प्रमुख प्रा. पूजा म्हात्रे यांनी केले. त्यांनी वैज्ञानिक स्पर्धांद्वारे विद्यार्थ्यांमधील सृजनशीलतेला प्रोत्साहन देत वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्राचार्य रवींद्र पाटील यांनी राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त ‘रामन इफेक्ट’ च्या ऐतिहासिक शोधाचे महत्त्व विशद करत सी. व्ही. रामन यांच्या योगदानाबद्दल माहिती दिली. कला विभाग प्रमुख डॉ. नम्रता पाटील यांनी विज्ञान साहित्यातील प्रगती व एआय (AI) तंत्रज्ञानावर भाष्य केले, तर प्रा. दिनेश पाटील यांनी विद्यार्थ्यांना चिकित्सक वृत्ती जोपासण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे अध्यक्षीय वक्तव्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ओमकार पोटे यांनी केले. यांनी आपल्या भाषणात राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त सी. व्ही. रामन यांच्या कार्याचे स्मरण केले. त्यांनी विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न घेता वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासण्याचे आणि नवनवीन प्रयोगाद्वारे स्वतःची प्रगती करण्याचे आवाहन केले.

राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आयोजित विविध स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. जैव-रांगोळी स्पर्धेत- वेदिका म्हात्रे हिने प्रथम क्रमांक, सुजल पाटील व नयन गायकवाड यांनी द्वितीय क्रमांक, तर गौरी पुरोहित हिने तृतीय क्रमांक मिळवला. वर्किंग मॉडेल स्पर्धेत वैभव ठाकूर व श्रवण पाटील प्रथम क्रमांक, दीप कवळे व स्मित पाटील द्वितीय क्रमांक, तर ओम देशमुख व हर्षल कनोजे तृतीय क्रमांक प्राप्त केला. पोस्टर प्रेझेंटेशनमध्ये अलीना औसेकर व पलक कराणी यांनी प्रथम, शर्वरी पाटील हिने द्वितीय, तर नियती पाटील व मानसी वार्गे यांनी तृतीय क्रमांक पटकावला. विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व मेडल्स देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.पूजा पाटील व प्रा. कैलास सिंग राजपूत यांनी केले, तर प्रा. करण वाडकर यांनी सर्वांचे आभार मानले.

Exit mobile version