कार्मेल कॉन्व्हेंटमध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात

| खोपोली | प्रतिनिधी |

महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, रायगड-अलिबाग आणि कार्मेल कॉन्व्हेंट स्कूल, खोपोली यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय क्रीडा दिन विविध क्रीडाविषयक उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे शाळेच्या परिसरात क्रीडामय वातावरण निर्माण झाले.

हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी 29 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा केला जातो. या निमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये क्रीडा प्रेमासोबतच शिस्त, संघभावना, नेतृत्वगुण, चिकाटी आणि निरोगी जीवनशैलीची जाणीव निर्माण करण्याच्या उद्देशाने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी मेजर ध्यानचंद तसेच भारताला पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक मिळवून देणारे महाराष्ट्राचे सुपुत्र स्वर्गीय खाशाबा जाधव यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विविध क्रीडा प्रतिकृती, प्रकल्प आणि फाईल्सचे प्रदर्शन भरविण्यात आले. विद्यार्थ्यांच्या कल्पकतेतून साकारलेल्या या प्रकल्पांचे उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या स्पोर्ट्स डान्सने कार्यक्रमात विशेष रंगत आणली. समीर शिंदे यांनी प्रास्ताविकातून राष्ट्रीय क्रीडा दिनाचे महत्त्व आणि विद्यार्थ्यांच्या जीवनात खेळाचे स्थान स्पष्ट केले.

खोपोली पोलीस ठाण्याचे एपीआय संदीप पाटील यांनी ‘खेळ, शिस्त आणि मानवी जीवनातील मूल्ये’ या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. आहार, क्रीडा दुखापती, ऑलिम्पिकचा इतिहास, विविध क्रीडा प्रकार तसेच खेळातून मिळणाऱ्या जीवनमूल्यांवर यावेळी मार्गदर्शन करण्यात आले. याप्रसंगी शाळेच्या लोकल मॅनेजर सिस्टर जुली मारिया, उपमुख्याध्यापिका सिस्टर स्वरुपिया, माजी विद्यार्थी शुभम नेमाने, महाराष्ट्र हॉकीचे खजिनदार कैलास सोनार, आंतरराष्ट्रीय पुरस्कार विजेते डॉ. महादेव शिंदे, राष्ट्रीय बुद्धिबळ प्रशिक्षक अंकित जोशी, आंतरराष्ट्रीय कराटे प्रशिक्षक रजिता गौड, तालुका क्रीडा समन्वयक जगदीश मरागजे, ज्येष्ठ क्रीडा शिक्षिका जयश्री नेमाने, समीर शिंदे, स्काऊट मास्टर संदीप साळुंखे आदी उपस्थित होते. राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना केवळ मैदानावरील विजय नव्हे, तर खेळातून शिस्त, पराभवातून शिकण्याची वृत्ती, संघभावना आणि आव्हानांवर मात करण्याची जिद्द आत्मसात करण्याचा संदेश देण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ज्येष्ठ क्रीडा शिक्षक जगदीश मरागजे, समीर शिंदे, जयश्री नेमाने, संदीप साळुंखे, नीता शर्मा, धारा टीचर आणि प्रिया फडके यांनी विशेष मेहनत घेतली.

Exit mobile version