नैसर्गिक पाण्याचा मार्ग अरुंद; आंबेघर, पेझारी येथील शेत जमीन पाण्याखाली

अलिबागच्या तहसीलदारांकडे ग्रामस्थांसह शेतकऱ्यांची तक्रार

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

नैसर्गिक पाण्याचा मार्ग खुले ठेवण्याच्या अटीवर सीएनजी पंप सुरु करण्याची परवानगी दिली होती. मात्र, त्या अटीचे उल्लंघन करून नैसर्गिक पाण्याचा रुंद मार्ग बांधकामाने अरुंद करण्यात आला आहे. त्याचा फटका आंबेघर, पेझारी परिसरातील भातशेतीला बसला आहे. अनेक घरांमध्ये पाणी शिरण्याचा धोका निर्माण झाला असल्याची तक्रार करण्यात आली आहे. अलिबागमधील तहसीलदार विक्रम पाटील यांच्याकडे बुधवारी (दि.1) दुपारी निवेदन देऊन बांधकामावर स्थगिती आणून अतिक्रमण हटविण्यात यावे अशी मागणी केली आहे.

यावेळी शेकाप जिल्हा चिटणीस मंडळाचे सदस्य अनिल पाटील, शेकाप तालुका चिटणीस सुरेश घरत, अलिबाग पंचायत समितीच्या सदस्या अंजली ठाकूर, दिगंबर म्हात्रे, स्नेहलता लडगे, मोहन म्हात्रे, प्रमोद घासे, अंबरनाथ पाटील, बाळाराम दांडेकर, निलेश चवरकर, मोहन ओव्हाळ, सुधाकर पाटील, उमेश म्हात्रे, चंद्रकांत पाटील, देविदास म्हात्रे, सुर्यकांत पाटील, महेंद्र पाटील आदी उपस्थित होते.


पेझारी ग्रामपंचायत हद्दीतील व आंबेघर येथील ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आलेल्या तक्रारीनुसार, आंबेघर येथील शेतजमीन धारक मोकल यांनी पेझारी ते पळी मार्गावर सीएनजी, पेट्रोल पंपाचे बांधकाम केले आहे. पेझारी येथील पुर्वपरंपरागत नाल्यापासून मोकल यांच्या शेतीला लागून नैसर्गिक पाण्याचा मोठा नाला(मार्ग) होता. पेट्रोल पंपाच्या बांधकामामुळे नाल्याचा मार्ग अरुंद करण्यात आला असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे आंबेघर व पेझारी येथील शेतजमीन पाण्याखाली जाण्याचे संकट उभे राहिले आहे. पाणी जाण्याचा मार्ग अरुंद असल्याचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. त्याचा परिणाम भात पेरणी केलेल्या रोपांवर होत आहे. ही रोपे नष्ट झाली आहेत. या अरुंद पाण्याच्या मार्गामुळे शेतकऱ्यांच्या घरांमध्ये पाणी जाण्याचा धोका आहे. या पंपासाठी परवानगी देताना नैसर्गिक पाण्याचा मार्ग खुला करण्यात यावा अशी अट जिल्हाधिकारी यांनी घातली आहे. मात्र त्या अटीचे पालन न करता, बिनधास्तपणे बांधकाम करण्यात आले असल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे. त्यामुळे या बांधकामावर स्थगिती आणून अतिक्रमण हटविण्यात यावे अशी मागणी निवेदनातून केली आहे.

Exit mobile version