ग्रामीण रंगभूमी हीच समाजजागृतीची खरी शाळा: कैलास पिंगळे
| अलिबाग | प्रतिनिधी |
पी.एन.पी. कला विकास मंडळाच्या अंतर्गत ग्रामीण रंगभूमी आयोजित ‘नाट्यप्रभा ग्रामीण नाट्य महोत्सवा’ने अलिबागच्या सांस्कृतिक विश्वात नवचैतन्य फुलवले आहे. दि.18 मे रोजी माजी आमदार जयंत पाटील यांच्या प्रेरणेने आणि चित्रलेखा पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या या महोत्सवाने ग्रामीण रंगभूमीच्या परंपरेला नवा उजाळा दिला आहे. खेडोपाड्यातील कलावंतांच्या जिद्दीने आणि कलाप्रेमाने महाराष्ट्राची ग्रामीण रंगभूमी वर्षानुवर्षे फुलत आली असून, त्याच परंपरेचा हा प्रेरणादायी वारसा असल्याचे मत ज्येष्ठ साहित्यिक कैलास पिंगळे यांनी व्यक्त केले.
ग्रामीण भागातील सामान्य माणसांनीच रंगभूमी सजवली, रुजवली आणि विकसित केली. गावागावांतून उभी राहिलेली ही नाट्यचळवळ आता नव्या दमाने बहरत असून, नाट्यचळवळ आता बाळसे धरल्याशिवाय राहणार नाही, ही काळ्या दगडावरील पांढरी रेघ आहे, असेही त्यांनी ठामपणे नमूद केले. अलिबाग तालुक्याची नाट्यपरंपरा अतिशय समृद्ध असल्याचे सांगताना त्यांनी स्वातंत्र्यपूर्व काळातील ज्येष्ठ नाटककार भ.ल. पाटील यांच्या कार्याचा विशेष उल्लेख केला. कोकणसिंह नारायण नागू पाटील यांचे सहकारी असलेल्या भ.ल. पाटील यांनी चौदा नाटकांचे लेखन करून ग्रामीण रंगभूमीवरून समाजप्रबोधन घडवून आणले. चरी शेतकरी संपाच्या काळात त्यांनी नाटकातून शेतकरी वर्गासाठी एल्गार पुकारला होता, हे विसरून चालणार नाही, असे पिंगळे म्हणाले.
पूर्वी अलिबाग, महाड, पेण आणि पनवेल परिसरात अनेक नाटक कंपन्या कार्यरत होत्या. दत्ता खानविलकर यांच्यासारखे राजकीय नेते हे उत्कृष्ट अभिनेते म्हणूनही प्रसिद्ध होते. प्रकाश गुर्जर, शरद कोरडे, प्रकाश जोशी यांसारख्या कलाकारांनी अलिबागच्या मातीतूनच रंगभूमीवर ठसा उमटवला. सांबरी कुर्डूसपासून रेवसच्या टोकापर्यंत गावोगावी हौशी नाटकांची परंपरा फुलली होती. त्या काळात एक स्त्री पात्र असलेली, कौटुंबिक आशयाची नाटकं गावोगावी रंगत असत. मनोरंजनासोबतच समाजप्रबोधनाचे प्रभावी माध्यम म्हणून ग्रामीण नाटकांकडे पाहिले जात होते. मराठी रंगभूमीच्या इतिहासाचा आढावा घेताना कैलास पिंगळे यांनी विष्णू अमृत भावे यांच्या ‘सीता स्वयंवर’पासून सुरू झालेल्या प्रवासाचा उल्लेख केला. त्यानंतर ‘वस्त्रहरण’, ‘सौभद्र’, राम गणेश गडकरी यांचे ‘एकच प्याला’, वि.वा. शिरवाडकर यांचे ‘नटसम्राट’, आचार्य अत्रे यांचे ‘तो मी नव्हेच’, तसेच ‘घाशीराम कोतवाल’ आणि ‘सखाराम बाईंडर’ यांसारख्या नाटकांनी मराठी रंगभूमीला वैचारिक समृद्धी दिल्याचे त्यांनी सांगितले.
पूर्वीच्या काळात मनोरंजनाची साधने मर्यादित होती, त्यामुळे गावात एक तरी नाटक व्हायचेच. ध्वनी आणि प्रकाशयोजना नसतानाही अभिनयाच्या जोरावर नाट्यप्रयोग गाजायचे. त्या काळातील अनेक कलाकारांनी ग्रामीण रंगभूमी समृद्ध केली. कुर्डूसमधील रामचंद्र कमळ पाटील, नथुराम धर्मा पिंगळे, प्र.शं. पिंगळे, नटसम्राट म्हणून प्रसिद्ध असलेले बंडोपंत पिंगळे, मेढेखारचे सखाराम पाटील, ज.का. ठाकूर, पिटकिरीचे सदाशिव पाटील, गजानन पाटील, पेझारीचे राजन पांचाळ, बांधणचे प्रमोद पाटील, माणकुळेचे जितेंद्र कडवे, थळचे रणजीत घरत, नांगरवाडीचे सुनील धुमाळ, खिडकीचे गंभीर पाटील, पेझारीचे प्रकाश पाटील, हाशिवरेचे प्रणित म्हात्रे, हेमनगरचे पां.शि. पाटील, आर.के. पाटील, काचळीचे जना मास्तर, कुसुंबळेचे भास्कर पाटील, नेहुलीखंडाळाचे बबन पाटील, शहापूरचे राजाराम भगत तसेच नव्या पिढीतील प्रकल्प वाणी, संगीतकार विक्रांत वार्डे, उमाजीदादा, संकल्प केळकर, प्रतीक पानकर, सागर नार्वेकर, देवेंद्र केळुसकर, जितेंद्र पाटील, विजय म्हात्रे आणि काळोशी-खंडाळेगावच्या विजयाताई कुडव यांनी ग्रामीण रंगभूमीसाठी दिलेले योगदान मोठे असल्याचे त्यांनी गौरवाने नमूद केले.
विक्रांत वार्डे आणि राजन पांचाळ यांनी पी.एन.पी. नाट्यगृहातील महोत्सव यशस्वी करण्यासाठी अविश्रांत मेहनत घेतली. प्रतीक पानकर, अमोल मिठाग्री, दिनेश पाटील, अनिष मिठाग्री, संकल्प केळकर, देवेंद्र केळुस्कर, जितेंद्र पाटील, दीपक काळेल, यज्ञेश पाटील, प्रमोद पाटील, अंश म्हात्रे, यश बनसोडे, ऋषीं पडवळ, नितेश पाटील आणि सहकाऱ्यांनीही या उपक्रमात मोलाची साथ दिली.
ग्रामीण रंगभूमीने समाजाला जोडले
ग्रामीण रंगभूमी ही भारतीय संस्कृतीचा पाया आहे. समाजाला जोडण्याचे आणि जागृत ठेवण्याचे प्रभावी माध्यम म्हणजे रंगभूमी. नव्या लेखकांनी मामा वरेरकर, अण्णासाहेब किर्लोस्कर, गो.ब. देवल, खाडिलकर, गडकरी, कोल्हटकर आणि शिरवाडकर यांच्या नाटकांचा अभ्यास करून प्रभावी नाट्यलेखन करावे, असे आवाहन कैलास पिंगळे यांनी केले आहे.
