स्वदेस फाऊंडेशनच्या मदतीने ऋतिका मांगलेचे यश
| पाली | प्रतिनिधी |
सुधागड तालुक्यातील नवघर कासारवाडी येथील ऋतिका राजेश मांगले या विद्यार्थिनीने नुकत्याच झालेल्या (बॅचलर ऑफ होमियोपॅथिक मेडिसिन अँड सर्जरी) परीक्षेमध्ये केडीएमजी एचएमसी शिरपूर-धुळे या कॉलेजमधून घवघवीत यश संपादन केले असून, ती आता डॉक्टर झाली आहे. जिद्द, मेहनत आणि योग्य वेळी स्वदेस फाऊंडेशनकडून मिळालेल्या मदतीच्या बळावर तिने हे स्वप्न साकार केले आहे.
रॉनी स्क्रूवाला व झरीना स्क्रूवाला यांच्या स्वदेस फाऊंडेशनच्यावतीने रायगड जिल्ह्यामधील माणगाव, तळा, म्हसळा, श्रीवर्धन, महाड, पोलादपूर व सुधागड तालुक्यामध्ये ग्रामीण सक्षमीकरणाचे प्रकल्प गाव विकास समितीच्या सहकार्याने राबविण्यात येत आहेत. स्वदेस शिष्यवृत्ती योजना ही त्या उपक्रमाचा एक भाग आहे. शिष्यवृत्तीच्या माध्यमातून शिष्यवृत्तीच्या माध्यमातून आत्तापर्यंत 897 गरीब व होतकरू विद्यार्थ्यांनी आपले उच्च शिक्षण पूर्ण करून चांगल्या प्रकारची नोकरी मिळवलेली आहे आणि काही विद्यार्थी चांगल्या पद्धतीने शिक्षण घेत आहेत. यामधील ऋतिका ही एक हुशार विद्यार्थिनी आहे. ऋतिकाचे वडील एका कंपनीत काम करत असताना, कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताची होती. मात्र, आपल्या मुलीला उच्च शिक्षण मिळावे, यासाठी त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. ऋतिका ही तिच्या कुटुंबातील पहिलीच मुलगी आहे, जिने वैद्यकीय पदवी प्राप्त केली आहे. या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.







