| नवीन पनवेल | प्रतिनिधी |
दोन लाख रुपयांच्या आमिषापोटी 23 हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी दोन अनोळखी इसमाविरोधात कळंबोली पोलीस ठाण्यात 29 ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.
निलेश दडस हे टाकेवाडी, सातारा येथे राहात असून, ते 29 ऑक्टोबर रोजी बँकेतून 23 हजार रुपये काढून दुसऱ्या बँकेत गेले. यावेळी शेजारील इसमांकडून त्यांनी बँकेत स्लिप भरून घेतली. यावेळी बँकेत आलेला दुसरा इसम हा हिंदीतून बोलू लागला. त्याने गोव्यावरून दोन लाख रुपये चोरून आणले असून, पैसे खात्यावर जमा करून द्या, अशी विनंती त्यांनी केली. बोलण्यात गुंतवून ते दोघे दडस यांना बाहेर घेऊन गेले आणि दोन लाख रुपये त्यांच्याकडे ठेवण्यास सांगितले. दडस यांनी नकार दिला. त्यावेळी दहा-पंधरा मिनिटांत येतो असे सांगितले आणि विश्वास नसेल तर तुझ्याकडचे 23 हजार माझ्याकडे ठेवायला दे असे सांगून काळ्या रंगाच्या प्लास्टिक पिशवीतून दोन लाख रुपये दडस यांना दिले आणि ते पायी निघून गेले. दोघांची वाट पाहिली असता ते आले नाहीत. दडस यांनी पिशवी उघडून पाहिली असता रुमालात पैसे होते. रुमाल उघडून पाहिला असता कागदांचे बंडल दिसून आले आणि फसवणूक झाल्याचे लक्षात आले.







