नवघर रेशन दुकानदाराची मुजोरी

तीन महिन्यांपूर्वीची पालकमंत्र्यांचे कारवाईचे आदेश
आदेशाला अधिकार्‍यांच्या वाटाण्याच्या अक्षदा

। पेण । वार्ताहर ।
पाटणोली ग्रामपंचायतच्या कार्यक्षेत्रात असणार्‍या नवघर ग्रामस्थांनी 11 जानेवारी 2022 रोजी रास्त धान्य दुकानदाराच्या विरुध्द तक्रारी अर्ज केला असून, या अर्जाकडे अधिकारी वर्ग हेतुपुरस्सर दुर्लक्ष करत आहेत.वारंवार या गावच्या महिला पुरवठा अधिकार्‍यांना भेटूनसुद्धा आश्‍वासनापलीकडे काहीच करत नाहीत. याप्रकरणी तीन महिन्यांपूर्वीच पालकमंत्र्यांनी कारवाईचे आदेश दिले आहेत. परंतु, त्या आदेशाला अधिकारी वर्गाकडून वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्या आहेत. दुकानदार व अधिकारी यांच्यात असलेल्या साटेलोट्यामुळेच कारवाईकडे दुर्लक्ष होत असल्याचे बोलले जात आहे.
ग्रामस्थांनी यापूर्वीदेखील मुजोर दुकानदारांविरुध्द अर्ज केले होते. परंतु त्यावेळेला देखील अधिकारी वर्गांनी कानाडोळा केला. नवघर येथे महालक्ष्मी महिला बचत गटाचे रास्त धान्य दुकान आहे. परंतु हे रास्त धान्य दुकान महिला बचत गट चालवतच नाहीत, तर गजानन मारूती कोळी हा चालवतो. तसेच तो मनमानेल तसे आम्हा ग्रामस्थांना धान्य देत असतो. कधीही धान्य मापात देत नाही. बोलायला गेल्यानंतर भांडणाला सुरूवात करतो, अशा तक्रारी ग्रामस्थांकडून करण्यात आल्या आहेत. अशा प्रकारे वारंवार निवेदन देऊनसुध्दा ग्रामस्थ नवघरच्या निवेदनाला अधिकार्‍यांकडून केराची टोपली दाखविली जात आहे. त्यामुळे जोपर्यंत कारवाई होत नाही, तोपर्यंत कोणीही दुकानदाराकडून धान्य घेणार नाही, असा एकमुखी निर्णय ग्रामस्थांकडून घेण्यात आला आहे.
भविष्यात शासनाने आम्हा नवघर ग्रामस्थांना अंतोरा रास्त धान्य दुकानदारांना जोडले तरी आम्ही तेथून धान्य घेण्यास तयार आहोत. मात्र, नवघर येथील रास्त धान्य दुकानातून आम्ही धान्य यापुढे घेणार नाही. कारण, गजानन कोळी यांचे अपमानास्पद व अशोभनिय वागणुकीमुळे आम्ही ग्रामस्थ त्रस्त झालो आहोत, अशी प्रतिक्रिया ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

दोन दिवसांत प्रश्‍न निकाली काढू
या प्रकाराबाबत नायब तहसीलदार तथा पुरवठा अधिकारी सुरेश थळे यांच्याशी संपर्क करून विचारणा केली असता त्यांनी सांगितले, की येत्या दोन दिवसात नवघर रास्त दुकानदारांचा प्रश्‍न निकाली काढण्यात येईल.

Exit mobile version