| नागाव | प्रतिनिधी |
रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशन आणि निखिल मयेकर मित्रमंडळ, नागाव यांच्या संयुक्त विद्यमाने वरिष्ठ गट (पुरुष व महिला) रायगड जिल्हा अजिंक्यपद आणि निवड चाचणी स्पर्धेला शनिवारपासून प्रारंभ झाला आहे. शनिवारी खेळविण्यात आलेल्या 64 सामन्यांतून नवजीवन पेझारी, म्हसोबा पेझारी, पांडबादेवी रायवाडी, मिडलाईन अकॅडमी कर्जत या चार संघांनी विजयी घोडदौड कायम राखत अंतिम 16 मध्ये स्थान मिळविले आहे.
नागावमधील संचालक मंडळ हायस्कूलच्या पटांगणावर सुरू असलेल्या या स्पर्धेतील शनिवारी झालेले सर्वच सामने रंगतदार झाले. वेगवान, आक्रमक चढाया करीत प्रत्येक संघ एका-एका गुणासाठी दम ठोकत असल्याचे चित्र दिसून आले. पाच दिवसीय या स्पर्धेत जिल्हाभरातून पुरुषांचे 256, तर महिलांचे 16 संघ सहभागी झाले आहेत. जवळपास 272 सामन्यांचा थरार कबड्डीप्रेमींना अनुभवता येणार आहे. या स्पर्धेतील कामगिरीवरुन खेळाडूची जिल्हा पुरुष कबड्डी संघात निवड करण्यात येणार आहे. दरम्यान, सामने पाहण्यासाठी जिल्हाभरातून कबड्डीप्रेमींनी मोठी गर्दी केली आहे.