नौदलातील जवानाचा रेल्वे अपघातात मृत्यू

पार्थिव सन्मानपूर्वक कुटुंबियांकडे सुपूर्द

। पनवेल । वार्ताहर ।

भारतीय नौदलात कार्यरत असलेले जवान सेवानिवृत्तीचे आवश्यक कागदपत्रे जमा करण्यासाठी मुंबईत आले असता पनवेल येथे रेल्वेत अपघातात त्यांचा मृत्यू झाला. लोहमार्ग पोलीस आणि नौदलातील जवानांनी त्यांचे पार्थिव कायदेशीर सोपस्कार करून सन्मानपूर्वक त्यांच्या कुटुंबीयांकडे सुपूर्द केले. संतोष कुमार असे त्यांचे नाव असून दमन तटरक्षक दलात ते कार्यरत होते.

संतोष कुमार हे भारतीय नौदलातून 2025 ला सेवानिवृत्त होणार असल्याने कागदपत्रे पूर्ण करण्यासाठी पनवेलला आले होते. मंगलोर उदना एक्सप्रेस या गाडीच्या डब्यात चढत असताना तोल जाऊन ते गाडीच्या चाका खाली आले. यात त्यांच्या डोक्याला जबर मार लागून ते गंभीर जखमी झाले. त्यांना हवालदार इंगवले यांनी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले. या घटनेची माहिती पोलिसांनी नौदल आणि त्यांच्या कुटुंबीयांना दिली. त्यांनतर संतोष कुमार यांची मुलगी आणि कुटुंबीय पार्थिव घेण्यासाठी दाखल झाले असता नौदलातील जवानांनी सन्मानपूर्वक मानवंदना देत त्यांचे पार्थिव कुटुंबीयांच्या ताब्यात दिले.

Exit mobile version