बिहार स्पेशल टास्क फोर्स आणि महाड एमआयडीसी पोलिसांची संयुक्त कारवाई
। महाड । प्रतिनिधी ।
महाड तालुक्यातून जहाल नक्षलवाद्याला पकडण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे. बिहार स्पेशल टास्क फोर्स आणि महाड एमआयडीसी पोलिसांनी संयुक्त कारवाई करीत या नक्षलवाद्याला ताब्यात घेतले आहे.
महाड तालुक्यातील देशमुख कांबळे या गावातून गुरुवारी (दि. 27) मध्यरात्रीच्या सुमारास एका जहाल नक्षलवाद्याला अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. महाड एमआयडीसी पोलीस व बिहार स्पेशल टास्क फोर्स यांनी ही संयुक्त कारवाई केली आहे. संबंधित आरोपीवर 2014 मध्ये बिहार येथे देशद्रोहाचा गुन्हा दाखल आहे.
मागील काही महिन्यापूर्वी महाड एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीमध्ये बांगलादेशी घुसखोरांनादेखील अटक करण्यात आली होती तर खून करून पळून आलेला मध्यप्रदेश येथील आरोपीदेखील महाड तालुक्यातच सापडल्याने सर्वत्र खळबळ पसरली आहे. दिनांक 12 एप्रिल रोजी देशाचे गृहमंत्री अमित शहा यांचा संभाव दौरा होत असून देशमुख कांबळे गावच्या हद्दीतील एका नामांकित कारखान्याच्या उद्घाटनासाठी देशाचे गृहमंत्री येणार असल्याने पोलीस प्रशासन मात्र ॲक्शन मोडवर आल्याचे दिसत आहे.