| मुंबई | प्रतिनिधी |
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे 1959 पासूनचे कार्यकर्ते व ज्येष्ठ नेते, पक्षाचे माजी राज्य सचिवमंडळ सदस्य, अखिल भारतीय किसान सभेचे माजी राज्य उपाध्यक्ष, माजी खासदार, माजी आमदार कॉम्रेड लहानू कोम यांचे बुधवारी पहाटे 5 वाजून 30 मिनिटांनी अल्पशा आजाराने निधन झाले. गेले दहा दिवस त्यांच्या रुग्णालयात उपचार सुरू होते. मृत्युसमयी ते 86 वर्षांचे होते. त्यांच्यामागे पत्नी हेमलता, पुत्र सुबोध, सून सुजाता, नातू तुषार, कन्या सुनंदा, जावई हरिश्चंद्र खुलात, नातू विजय आणि नात रुचिता असा परिवार आहे. कॉम्रेड लहानू कोम यांची अंत्ययात्रा उद्या गुरुवार, दिनांक 29 मे रोजी दुपारी 12 वाजता पालघर जिल्ह्यात तलासरी येथील कॉम्रेड गोदावरी शामराव परुळेकर भवन या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या जिल्हा कार्यालयातून निघणार आहे.